दोन एसपीओंचे मृतदेह आढळले गोळ्या झाडून हत्या सर्व्हिस रायफलही गायब

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
किश्तवाड
jammu and kashmir
 जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह परिसरात दोन विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) बेपत्ता झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. देहरना जंगल परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आल्यानंतर बेपत्ता झालेल्या ऋषिपाल आणि बॉबी चंद या दोन्ही एसपीओंचे मृतदेह शोधमोहिमेदरम्यान आढळून आले आहेत. दोघांच्याही शरीरावर गोळ्यांच्या जखमा असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.



ऋषिपाल आणि बॉबी चंद हे दोघेही विशेष अभियान गटाच्या (एसओजी) पथकात कार्यरत होते. कियार दच्छन येथून अपर रिज देहरना परिसरातील इंदरवन येथील बसनानमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या १७ राष्ट्रीय रायफल्सच्या पथकाला कार्यमुक्त करून त्यांच्या जागी दुसरे पथक पाठविण्याच्या प्रक्रियेसाठी ते निघाले होते. मात्र, नियोजित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांचा संपर्क तुटला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही एसपीओ कियार कॅम्पमधून ढारना-मारवाह येथील लष्करी चौकीच्या दिशेने रवाना झाले होते. सुरुवातीला त्यांच्या मोबाईलवर संपर्क होत होता. मात्र, काही वेळानंतर दोन्ही मोबाईल क्रमांक बंद झाले. त्यामुळे त्यांच्या ठावठिकाणाबाबत आणि सुरक्षिततेबाबत संशय निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दोघांचे मृतदेह आढळून आले.

या घटनेतील आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे दोन्ही मृत जवानांची सर्व्हिस शस्त्रे घटनास्थळी किंवा त्यांच्या मृतदेहांजवळ आढळलेली नाहीत. त्यामुळे या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, तपासातून ठोस तथ्य समोर येईपर्यंत या घटनेचा संबंध थेट दहशतवादी कारवाईशी जोडणे घाईचे ठरेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दोन्ही एसपीओ बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दुर्गम डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेतली होती. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासोबतच ते कोणत्या परिस्थितीत बेपत्ता झाले, याचा उलगडा करण्यासाठी आसपासच्या भागातही सुरक्षा पथके तैनात करण्यात आली होती. अखेर या शोधमोहिमेत दोघांचे मृतदेह मिळाले.

किश्तवाड हा डोंगराळ जिल्हा गेल्या काही वर्षांत दहशतवादाशी संबंधित घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. अशा परिस्थितीत दोन एसपीओंची गोळ्या झाडून हत्या झाल्याने या भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

दरम्यान, यापूर्वी नुकताच जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर हल्ला झाल्याची घटनाही समोर आली होती. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरणही समोर आले होते. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, नाक्यावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या सलग घटनांमुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.