अरविंद केजरीवाल यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी?

७ कोटींची खंडणी मागितली; मुलगी आणि पत्नीलाही लक्ष्य करण्याचा इशारा

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |

नवी दिल्ली,
kejriwal-lawrence-bishnoi-threatदिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कथित गँग सदस्याने केजरीवाल यांच्याकडे सात कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ही रक्कम न दिल्यास अरविंद केजरीवाल, त्यांची मुलगी आणि पत्नी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार जर्नेल सिंग यांनी पंजाब पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

arvind kejriwal 
आमदार जर्नेल सिंग यांना फोन आणि व्हॉट्सॲपवर धमकी
दिल्लीतील टिळक नगर विधानसभा मतदारसंघाचे आम आदमी पक्षाचे आमदार जर्नेल सिंग यांना एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून धमकीचे संदेश प्राप्त झाले. संबंधित व्यक्तीने स्वतःचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सात कोटी रुपये द्यावेत, अन्यथा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्यात येईल, असा इशारा कथित आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फोनवर धमकी दिल्यानंतर व्हॉट्सॲपवरही यासंदर्भात संदेश पाठविण्यात आला होता.या घटनेनंतर आमदार जर्नेल सिंग यांनी ६ नोव्हेंबर रोजी पंजाबमधील मोहालीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे (एसएसपी) लेखी तक्रार दाखल केली. धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तसेच अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे. तक्रारीनंतर मोहाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाचा तपास मोहाली सायबर क्राइम पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकाची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे.संशयित व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड्स, आयपी लॉग्स आणि मोबाइल लोकेशनची माहिती तपासली जात आहे. या तांत्रिक माहितीच्या आधारे धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा खरोखरच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.