मुंबई,
maharashtra-road-accidents-2026महाराष्ट्रात रस्ते अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नसून, यंदाच्या पहिल्या सात महिन्यांत अपघातांमध्ये हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत राज्यभरात तब्बल २१ हजार ४४७ रस्ते अपघातांची नोंद झाली. या अपघातांमध्ये ९ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत फारसा फरक नसला, तरी मृत्यूंच्या प्रमाणात सुमारे साडेपाच टक्क्यांनी घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
अपघातांची संख्या तीन वर्षांपासून कायम
राज्यातील मागील तीन वर्षांतील रस्ते अपघातांच्या आकडेवारीचा विचार केला असता, अपघातांची संख्या २१ हजारांच्या पुढेच असल्याचे दिसून येते. जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्यांत राज्यात २१ हजार ३६० अपघात झाले होते. २०२५ मध्ये याच कालावधीत अपघातांची संख्या वाढून २१ हजार ६०२ वर पोहोचली. तर २०२६ मध्ये ही संख्या २१ हजार ४४७ इतकी नोंदविण्यात आली.
त्यामुळे गेल्या तीन वर्षांत अपघातांच्या संख्येत फारशी घट झालेली नाही. अपघातांचे प्रमाण जवळपास स्थिर असले, तरी त्यातून होणारे मृत्यू हे चिंतेचे कारण ठरत आहेत.रस्ते अपघातांमधील मृत्यूंची आकडेवारी पाहता, २०२४ मध्ये पहिल्या सात महिन्यांत ९ हजार ३५४ जणांचा मृत्यू झाला होता. २०२५ मध्ये ही संख्या वाढून ९ हजार ७३१ वर गेली. मात्र, २०२६ मध्ये जानेवारी ते जुलैदरम्यान ९ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५३६ मृत्यू कमी झाले असून, मृत्यूंच्या संख्येत साडेपाच टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. असे असले तरी यंदाच्या सात महिन्यांत दररोज सरासरी ४३ प्रवाशांना रस्ते अपघातांत प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे मृत्यूंच्या प्रमाणात झालेली घट दिलासादायक असली, तरी अपघातांचे गांभीर्य कायम आहे.रस्ते अपघातांमागे अनेक कारणे असल्याचे समोर आले आहे. वाहन चालवताना वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे या प्रमुख कारणांचा त्यात समावेश आहे.
या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्ता सुरक्षा विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यावर प्रशासन विशेष भर देत आहे. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच 'गोल्डन अवर'मध्ये उपचार उपलब्ध झाल्यास जखमींचे प्राण वाचविण्याची शक्यता वाढते.वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यावर भर दिल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघाती मृत्यूंच्या संख्येत घट झाल्याचा दावा परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.