महाराष्ट्राच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय झळाळी!

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
मुंबई
konkan beaches
महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. कोकणातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार अंतिमतः जाहीर झाला आहे. या तिन्ही किनाऱ्यांना अंतिम मान्यता मिळाल्याची माहिती नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी दिली. डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (एफईई) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून लवकरच या समुद्रकिनाऱ्यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.



पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यावर भर देत आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य दिले जात आहे. या प्रयत्नांना मिळालेली आंतरराष्ट्रीय मान्यता राज्याच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

कोकणातील पर्यटन व्यवसायाला मिळणार नवी चालना

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांना मिळालेल्या अंतिम मानांकनामुळे कोकणच्या पर्यटन क्षमतेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. या पुरस्कारामुळे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांचे लक्ष महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यांकडे आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, कोकणातील हॉटेल व्यवसाय, स्थानिक पर्यटन सेवा, रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाशी निगडित पूरक उद्योगांना चालना मिळू शकते.महाराष्ट्राला सुमारे ८७८ किलोमीटर लांबीची विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गरम्य परिसर, समृद्ध सागरी जैवविविधता, ऐतिहासिक वारसा, स्थानिक लोकसंस्कृती आणि अस्सल कोकणी खाद्यसंस्कृती ही कोकण पर्यटनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या पार्श्वभूमीवर तीन समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम पुरस्कार महाराष्ट्राच्या किनारपट्टी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा ठरणार आहे.


“महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम पुरस्कार मिळणे ही राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी आहे. या मानांकनामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक दृढ होईल. किनारपट्टीचा विकास करताना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांचा समतोल राखणे हे शासनाचे प्राधान्य आहे. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे बळ मिळेल,” असे पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले. भविष्यात राज्यातील अधिकाधिक पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘ब्लू फ्लॅग’ मानांकनासाठी कोणते निकष?

‘ब्लू फ्लॅग’ हा पर्यावरणपूरक आणि सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभरात मान्यता असलेला प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जनजागृती आणि शाश्वत व्यवस्थापन अशा विविध निकषांच्या आधारे हे मानांकन दिले जाते. त्यामुळे या तीन किनाऱ्यांना मिळालेली अंतिम मान्यता ही केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर पर्यावरणपूरक किनारपट्टी व्यवस्थापनासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.