कारंजा लाड,
major-fire-at-bothara-ginning-in-dhanaj-bk कारंजा तालुक्यातील धनज बु. येथील बोथरा जिनिंग परिसरात साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान घटना घडली. या आगीत एक हजार क्विंटलहून अधिक कापूस जळुन खाक झाला असून, जिनिंग मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोथरा जिनिंगच्या परिसरातील मोकळ्या जागेत एकूण पाच हजार क्विंटल कापूस साठवण्यात आला होता. दरम्यान, आर्णी येथून कापूस घेऊन आलेल्या एका ट्रकमधील कापूस खाली करण्याचे काम सुरू होते. यावेळी ट्रकच्या गरम सायलन्सरचा कापसाशी संपर्क आल्याने कापसाच्या गंजीने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आग पसरू नये म्हणून कापसाची गंजी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ट्रॅक्टरनेही पेट घेतला. मात्र, गावातील तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ ट्रॅक्टर बंद करून त्यावरील आग विझवली आणि मोठी दुर्घटना टाळली. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारंजा लाड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
परंतु, कारंजा येथून निघालेल्या अग्निशमन दलाच्या गाडीचा खराब रस्त्यामुळे आखातवाडा नजीक रॉड नादुरुस्त झाल्याने ही गाडी घटनास्थळी पोहोचू शकली नाही. अखेर गावातील तरुणांनी व स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाची गाडी वेळेत न पोहोचल्यामुळे आगीची तीव्रता वाढली आणि एक हजार क्विंटलपेक्षा जास्त कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
विद्युत पुरवठाही खंडित
सदर आगीची घटना घडली त्या वेळेस संपूर्ण गावातील विद्युत पुरवठा हे ट्रान्सफर चे काम सुरु असल्याने बंद करण्यात आला होता. त्यामुळे आग लागता क्षणी आगेवर तात्काळ नियंत्रण मिळविता येऊ न शकल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जवळपास दोन हजार क्विंटल कापुस खाक
आज दुपारी माझ्या जिनिंगला लागलेल्या आगेत जवळपास दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. ट्रकच्या गरम सायलन्सरचा कापसाशी संपर्क आल्याने ही आग लागली आहे. गावातील युवकांनी व कामगारांनी अथक प्रयन्त करून ही आग आटोक्यात आणली.
सुनील बोथरा मालक बोथरा जिनींग, धनज बु.