मालवणी भाषेला मिळणार जागतिक ओळख!

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
सिंधुदुर्ग
malvani language
मालवणी भाषा, संस्कृती आणि समृद्ध लोककलेचा वारसा जतन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र ‘मालवणी संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून मालवणी भाषेचे शास्त्रीय संशोधन, विविध बोलींचे दस्तऐवजीकरण, स्वतंत्र शब्दकोश निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेचा प्रसार केला जाणार आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्रा’च्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.



मालवणी भाषा ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. या भाषेला स्वतंत्र शब्दसंपदा, म्हणी, साहित्य, लोकपरंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मात्र, काळानुसार या भाषेतील विविध बोली, स्थानिक शब्द आणि लोकपरंपरा लोप पावू नयेत, यासाठी त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संकलन आणि जतन करण्याची आवश्यकता आहे. हीच गरज लक्षात घेऊन संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार होणार

मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मालवणी भाषेतील विविध बोलींचा स्वतंत्र शब्दकोश तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. या शब्दकोशात प्रादेशिक शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार आणि भाषिक वैशिष्ट्यांची नोंद केली जाणार आहे.मालवणी भाषेतील शब्दवैभव एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे भाषा अभ्यासक, संशोधक, साहित्यिक आणि नव्या पिढीला त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच मालवणी भाषेचा शैक्षणिक आणि संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण संदर्भसाहित्य उपलब्ध होईल.मालवणी संशोधन केंद्राचे काम केवळ भाषा आणि शब्दकोश निर्मितीपुरते मर्यादित राहणार नाही. या भागातील लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक कलाकारांच्या योगदानाचेही दस्तऐवजीकरण केले जाणार आहे.

मालवणी संस्कृतीचे विविध पैलू पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्थानिक कलाकारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून केला जाणार आहे. मालवणी भाषेला केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घोषणा

या उपक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार दीपक केसरकर, आमदार डॉ. निलेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते. बैठकीत मालवणी भाषा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी संशोधन केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांवर चर्चा झाली.या केंद्राच्या स्थापनेमुळे मालवणी भाषेच्या अभ्यासाला संस्थात्मक स्वरूप मिळणार असून, भाषेतील शब्दसंपदा, बोलीभेद, साहित्य आणि लोकपरंपरांचे जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल पडणार आहे. कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा ठेवा असलेल्या मालवणी भाषेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.