मुंबई
medha rana अभिनेता अहान शेट्टीच्या आगामी ‘सनकी’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. टीनू सुरेश देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या अॅक्शन आणि रोमँटिक चित्रपटात आता अभिनेत्री मेधा राणाचीही वर्णी लागली आहे. या चित्रपटात मेधा मुख्य भूमिकेत दिसणार असून, ती अहान शेट्टीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

मेधा यापूर्वी ‘बॉर्डर 2’ या चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबत झळकली होती. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मेधा आपल्या पुढील प्रोजेक्टची निवड काळजीपूर्वक करण्याच्या विचारात होती. अभिनयासोबतच काहीतरी वेगळे आणि दमदार सादर करण्याची संधी मिळेल, अशा मोठ्या चित्रपटाच्या शोधात ती होती. ‘सनकी’ची कथा ऐकल्यानंतर हा प्रोजेक्ट आपल्या अपेक्षांशी जुळणारा असल्याचे तिला जाणवले आणि तिने या चित्रपटासाठी होकार दिला.
मेधा गेल्या दोन महिन्यांपासून ‘सनकी’साठी विशेष तयारी करत आहे. आपल्या भूमिकेचे स्वरूप आणि तिच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तिने विविध कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. भूमिकेची मागणी लक्षात घेऊन तिने अतिरिक्त तयारीही केली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण भोपाळमध्ये सुरू झाले असून, मेधानेही अहान शेट्टी आणि चित्रपटाच्या उर्वरित टीमसोबत शूटिंगला सुरुवात केली आहे.
या चित्रपटात मेधा अहानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. प्रेम, भावनिक गुंतागुंत आणि दमदार अॅक्शन अशा विविध पैलूंनी तिची व्यक्तिरेखा सजलेली असेल. अभिनयाबरोबरच अॅक्शन करण्याची संधी मिळेल, अशा भूमिकेच्या शोधात मेधा होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली तिची तयारी या भूमिकेसाठीच केंद्रित आहे.
विशेष म्हणजे, ‘बॉर्डर 2’मध्ये अहान आणि मेधा वेगवेगळ्या कलाकारांसोबत दिसले होते. मात्र, ‘सनकी’च्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र रोमँटिक भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे या नव्या जोडीची पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘सनकी’चे चित्रीकरण सध्या भोपाळमध्ये सुरू असून, २०२७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चर्चेतील अॅक्शनपटांपैकी हा एक चित्रपट मानला जात आहे. चित्रपटाची पहिली झलकही येत्या काही दिवसांत प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे. वी द पीपल, रोरिंग रिव्हर प्रॉडक्शन्स आणि पाल्स अँड पीयर्स एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थांकडून संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.