शेअर बाजारात किरकोळ तेजी; अखेर सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
stock market भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (१२ नोव्हेंबर) दिवसभर चढ-उताराचे वातावरण राहिले. अखेरच्या टप्प्यात झालेल्या किरकोळ खरेदीमुळे दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सकारात्मक पातळीवर व्यवहाराची सांगता केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१.६१ अंकांची म्हणजेच ०.०४ टक्क्यांची वाढ नोंदवत ८१,९११.०१ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४४.३० अंकांनी म्हणजेच ०.१८ टक्क्यांनी वधारून २५,२९९.३५ अंकांवर स्थिरावला. दिवसभरात एकूण २,२७९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर १,८२२ शेअर्स घसरले. १६७ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. दुसरीकडे, भारतीय रुपयाची घसरण कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपया ३४ पैशांनी कमजोर होऊन ९४.०३ या स्तरावर बंद झाला. बुधवारी हाच दर ९३.६९ रुपये होता.
 
stock market
 
 
व्यवहारादरम्यान निफ्टीमध्ये एचडीएफसी लाईफ, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि एसबीआय या कंपन्यांच्या शेअर्सनी सर्वाधिक वाढ नोंदवली. याउलट ओएनजीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल), महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम), नेस्ले आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला. क्षेत्रनिहाय व्यवहारात रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्सनी आघाडी घेत निफ्टी रिअल्टी निर्देशांकात ३.६ टक्क्यांची वाढ केली. पीएसयू बँक निर्देशांक ०.९३ टक्के, मीडिया ०.८३ टक्के आणि बँक निफ्टी ०.७१ टक्क्यांनी वधारले. मात्र, वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक १.४९ टक्क्यांची घसरण झाली. फार्मा क्षेत्र ०.८४ टक्के, एफएमसीजी ०.६३ टक्के आणि ऑइल अँड गॅस क्षेत्र ०.६६ टक्क्यांनी खाली आले. आयटी, एनर्जी आणि इन्फ्रा निर्देशांकांतही अनुक्रमे ०.६४, ०.५५ आणि ०.४२ टक्क्यांची घट झाली. विशेष म्हणजे, प्रमुख निर्देशांकांची वाढ मर्यादित असतानाही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये अनुक्रमे ०.७ आणि १.१ टक्क्यांची तेजी दिसून आली.
बाजारातील या संमिश्र वातावरणावर भाष्य करताना जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अलीकडील तेजीचा फायदा घेत आयटी, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. मात्र, वित्तीय सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम असल्याने मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांची कामगिरी तुलनेने चांगली राहणे हे बाजारातील सकारात्मक गुंतवणूक वातावरणाचे संकेत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळत असला, तरी जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अस्थिरता आणि अमेरिकेतील अपेक्षेपेक्षा अधिक महागाईमुळे आंतरराष्ट्रीय बाजारांवर दबाव आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष भारताच्या ऑक्टोबर महिन्यातील ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय) आकडेवारीकडे लागले आहे. अन्नधान्याच्या किमतींमधील बदल, परकीय गुंतवणुकीचा प्रवाह आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांची नफाक्षमता या घटकांवर आगामी काळातील बाजाराची दिशा अवलंबून असेल.