मुंबई
Mumbai Bomb Threat मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शहरातील महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारा ई-मेल पुन्हा एकदा प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या ई-मेलमध्ये मुंबईच्या महापौर कार्यालयासह बँका, न्यायालय, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. महापौर कार्यालयाचा स्पष्ट उल्लेख असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या सातत्याने मिळत आहेत. साधारण दोन आठवड्यांपूर्वीही अशाच आशयाचा ई-मेल प्राप्त झाला होता. आता पुन्हा एकदा धमकीचा मेल आल्याने प्रशासनासह पोलिस यंत्रणांची धावपळ उडाली आहे. यापूर्वीच्या धमक्यांमध्ये प्रामुख्याने महापौर कार्यालयाचा उल्लेख होता; मात्र यावेळी अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
आज सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यामध्ये मुंबईतील महापौरांचे कार्यालय, बँका, न्यायालय, अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेबाबत यंत्रणांना सतर्क करण्यात आले.
ई-मेल प्राप्त होताच मुंबई महानगरपालिकेतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने महापौर कार्यालयाची तातडीने तपासणी केली. परिसरातील सुरक्षेचाही आढावा घेण्यात आला. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आली नाही. त्यामुळे महापौर कार्यालयातील नियमित कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे.या धमकीच्या ई-मेलमध्ये ‘खलिस्तान बोलेगा, मुंबई जिंदाबाद’ असा मजकूरही लिहिण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारे ई-मेल पाठवून बॉम्बस्फोटाची धमकी देण्याची ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक वेळी धमकीचा संदेश प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहून संबंधित ठिकाणांची तपासणी करावी लागत आहे.एकाच वेळी महापौर कार्यालयापासून विमानतळ, न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी मिळाल्याने मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपासणीत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली, तरी वारंवार अशा धमकीचे ई-मेल येत असल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.