नागपुरात ‘रॅपिडो’ बाईक टॅक्सी सेवेला वाहतूक पोलिसांचा दणका

७०० चालकांच्या रोजगारावर संकट

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-rapido-bike-taxi-banनागपूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या ‘रॅपिडो’ बाईक टॅक्सी सेवेविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. आवश्यक परवानग्या नसतानाही खासगी दुचाकींचा व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याने या सेवेवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागपुरातील रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दररोज या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ६०० ते ७०० चालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 

rapido 
नागपूर शहरात कमी वेळेत आणि परवडणाऱ्या दरात इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि नोकरदार रॅपिडो सेवेचा वापर करत होते. सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, सदर आणि मिहान यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये या सेवेची मागणी अधिक होती. मात्र, आता वाहतूक शाखेने विनापरवाना बाईक टॅक्सीविरोधात जप्ती आणि दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो, आपली बस, अधिकृत टॅक्सी आणि ऑटो रिक्षा यांसारख्या पर्यायांचा आधार घ्यावा लागणार आहे.
शहरातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालक संघटनांनी अनधिकृत बाईक टॅक्सी सेवेमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली होती. या तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेने कारवाईचा निर्णय घेतला. ही सेवा कायमस्वरूपी बंद करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलली आहेत.
ॲग्रीगेटर परवाना नसल्याने सेवा अनधिकृत
महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवा चालवण्यासाठी संबंधित कंपनीकडे ‘ई-बाईक टॅक्सी ॲग्रीगेटर परवाना’ असणे मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक आहे. मात्र, नागपुरात सेवा देणाऱ्या रॅपिडोला प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाकडून असा कोणताही वैध परवाना मिळालेला नाही. त्यामुळे ही सेवा नियमबाह्य ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
राज्य शासन किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची अधिकृत मंजुरी नसताना खासगी दुचाकींचा व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले आहे. हा मोटार वाहन कायद्याचा भंग असल्याने संबंधित वाहनांवर जप्तीची कारवाई केली जात आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक परवाना आणि प्रवाशांसाठी आवश्यक विमा संरक्षण नसल्यास अपघाताच्या वेळी प्रवाशांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच ही कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी स्पष्ट केले. नियमांचे पालन न करता सुरू असलेल्या सेवेमुळे अपघात झाल्यास सुरक्षेची आणि नुकसानभरपाईची जबाबदारी निश्चित करणे कठीण होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
 
दरम्यान, परवानगीशिवाय सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेमुळे एकीकडे पारंपरिक प्रवासी वाहतूक व्यवसायिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या, तर दुसरीकडे कमी खर्चातील प्रवासाचा पर्याय म्हणून या सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांसमोर आता पर्यायी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे नागपुरातील शेकडो बाईक टॅक्सी चालकांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.