भाऊबीजेच्या दिवशी नागपूरच्या उदयोन्मुख खेळाडूचा अपघाती मृत्यू

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
नागपूर
nagpur-sepak-takraw-player-avani-bagheleभाऊबीजेच्या सणानिमित्त भावाला ओवाळण्यासाठी आईसोबत दुचाकीने निघालेल्या नागपूरच्या उदयोन्मुख सेपक टॅकरा खेळाडू अवनी किशोर बघेले (वय १८) हिचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी वाठोडा परिसराकडे जात असताना श्रावणनगरमधील संघर्षनगर चौकात हा अपघात घडला. राज्य संघात निवड झालेल्या अवनीच्या आकस्मिक निधनाने नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अवनी ही इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी परिसरात कुटुंबासह राहत होती. तिचा भाऊ वाठोडा परिसरात राहतो. भाऊबीज असल्याने भावाला ओवाळण्यासाठी अवनी आई माधुरी मुकेश बघेले यांच्यासोबत दुचाकीने निघाली होती. दुचाकी आई माधुरी चालवत होत्या.

ngp acci
 
 
सिग्नल सुटल्यानंतर भरधाव दुचाकीची धडक
नंदनवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास मायलेकी श्रावणनगर येथील संघर्षनगर चौकात पोहोचल्या. त्या वेळी वाहतूक सिग्नल लाल असल्याने माधुरी यांनी दुचाकी चौकात थांबवली. काही सेकंदांनंतर सिग्नल हिरवा झाल्यावर वाहन पुढे नेण्याच्या तयारीत असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या तुषार बबन बहोते याने त्यांच्या दुचाकीला कट मारला.
 
या प्रकारामुळे माधुरी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे अवनी रस्त्यावर डोक्याच्या बाजूने जोरात पडली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
 
वैद्यकीय सूचनेनंतर नंदनवन पोलिसांनी दुचाकीचालक तुषार बहोते याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.
अवनीने सेपक टॅकरा या खेळात उल्लेखनीय कामगिरी करत राज्य संघात स्थान मिळवले होते. राष्ट्रीय संघात निवड होण्याचे ध्येय ठेवून ती नियमित सराव करत होती. अजनी रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर तिचा सराव सुरू होता.
 
सेपक टॅकरा हा दक्षिण-पूर्व आशियातून उदयास आलेला खेळ असून त्याचे स्वरूप व्हॉलीबॉलसारखे आहे. मात्र, या खेळात चेंडू हाताऐवजी पायाने खेळला जातो. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही या खेळाला लोकप्रियता मिळत आहे. अवनीने या खेळातील कौशल्याच्या जोरावर राज्य संघात स्थान मिळवले होते. राष्ट्रीय स्तरावर चमकण्याच्या तयारीत असतानाच तिचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांचे स्वप्न अपूर्ण राहिले.अवनीसोबत सराव करणाऱ्या खेळाडूंनाही या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. भाऊबीजेच्या आनंदाच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे बघेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.