न्यूयॉर्कमध्ये तीन मजली इमारत कोसळली

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
न्यूयॉर्क
building collapse
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या ब्रुकलिनमधील फ्लॅटबुश परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणालगतची तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता असल्याने अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



न्यूयॉर्क अग्निशमन विभागाला बुधवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मोठ्या संख्येने अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेनंतर समोर आलेल्या हेलिकॉप्टरच्या चित्रणात अनेक बचाव कर्मचारी ढिगाऱ्यावर चढून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेताना दिसत आहेत. हातातील साधने आणि विद्युत करवतींच्या साहाय्याने ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. किमान चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य सहा जणांनाही किरकोळ दुखापती झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बचावकार्य सुरू असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढिगाऱ्यातील एका खड्ड्यात एक व्यक्ती जिवंत आढळली. तिच्या अंगावर धुळीचा थर साचला होता; मात्र ती हालचाल करत होती. बचाव कर्मचाऱ्यांनी तिला स्ट्रेचरवरून बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोसळलेली तीन मजली इमारत एका बांधकाम प्रकल्पाच्या अगदी शेजारी होती. संबंधित प्रकल्पासाठी यापूर्वी त्या जागेवरील एक मजली इमारत पाडण्यात आली होती. त्यानंतर तेथे खोदकाम सुरू होते. याच बांधकामाच्या लगत असलेली तीन मजली इमारत अचानक कोसळली. इमारतीचा विटा आणि लाकडांचा मोठा ढिगारा बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळला. मात्र, इमारत नेमकी कोणत्या कारणामुळे पडली, याचा तपास सुरू आहे.

या दुर्घटनेचा फटका परिसरातील अन्य इमारतींनाही बसला. कोसळलेल्या इमारतीला लागून असलेल्या दुसऱ्या इमारतीची एक भिंत पूर्णपणे ढासळली. संबंधित इमारत उभी असली तरी भिंत कोसळल्याने आतील खोल्या उघड्या पडल्या. बेडरूममधील वस्तू आणि कपड्यांनी भरलेल्या कपाटांसह घरातील साहित्य बाहेरून स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे या दुर्घटनेची तीव्रता लक्षात येत आहे.

अंधार पडल्यानंतरही बचावकार्य थांबविण्यात आले नाही. अग्निशमन कर्मचारी टॉर्चच्या प्रकाशात ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेत होते. यासाठी प्रशिक्षित श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली. तसेच ड्रोनच्या साहाय्याने घटनास्थळावर लक्ष ठेवण्यात येत होते. हाताने तसेच यांत्रिक साधनांच्या मदतीने ढिगाऱ्याचे मोठे तुकडे हटवून त्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध सुरू होता. दुर्घटनेनंतर परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी या दुर्घटनेबद्दल समाजमाध्यमांवर निवेदन प्रसिद्ध करून दुःख व्यक्त केले. दरम्यान, शहर प्रशासनाच्या नोंदींमध्ये संबंधित बांधकाम प्रकल्पाशी निगडित वास्तुविशारद, मालमत्ताधारक आणि मुख्य कंत्राटदारांची नावे उपलब्ध आहेत. दुर्घटनेबाबत त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी दूरध्वनी आणि ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.