निम्न वर्धा कालवे विभागाचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर

पाच दिवस उलटूनही विजयगोपाल परिसरातील शेतशिवार तहानलेलाच

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
देवळी,
wardha canal निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याला पाणी सोडून पाच दिवसांचा कालावधी होऊनही विजयगोपाल परिसरातील अनेक शेतशिवारांपर्यंत अद्याप पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही. त्यामुळे निम्न वर्धा कालवे विभागाचा नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे कालव्याऐवजी नाल्यातून पाणी वाहून जात असल्याचे चित्र असताना दुसरीकडे शेतकरी मात्र पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
 
 
wardha canal
 
 
निम्न वर्धा प्रकल्पाच्या उपविभाग-३ अंतर्गत येणार्या कोळणा व इंझाळा वितरिकेतून या परिसरातील शेतशिवारांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, धरणातून पाणी सोडून पाच दिवस झाले तरी कोळणा वितरिकेवरील विजयगोपाल, तांबा, नांदगाव, हिवरा तसेच इंझाळा वितरिकेवरील राघाळा, बाबापूर, मलातपूर, रोहणी व कोल्हापूर या गावांच्या शेतशिवारातील मायनरपर्यंत पाणी पोहोचलेले नाही. विशेष म्हणजे, कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा आणखी आठ दिवस करावी लागणार असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
रबी हंगामातील हरभरा तसेच खरीप हंगामातील कापूस व तूर पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पण, वितरिकेतून पाणी सोडूनही मायनरपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पिकांना पाणी द्यायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने अनेक शेतकर्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोळणा व इंझाळा वितरिकेवरील काही शेतकर्यांना पाणी मिळत असताना इतर शेतकर्यांना मात्र प्रतीक्षेत ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे. कोळणा गेट बंद करा असे अधिकार्यांकडून सांगण्यात येत असल्याचे काही कर्मचार्यांकडून सांगितले जाते. मग वितरिकेवरील गेट बंद करण्याचा निर्णय कोणत्या नियमाच्या आधारे घेतला जातो, असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
कालव्याऐवजी नाल्यातून पाणी वाहून जात असताना जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि अभियंते नेमके काय करीत आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी यांनी स्वतः दखल घेऊन निम्न वर्धा कालवे विभागाच्या अधिकार्यांना योग्य पाणी नियोजन करण्याचे निर्देश द्यावे.wardha canal विजयगोपाल, तांबा, नांदगाव, हिवरा तसेच इतर गावातील शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळावे, कोणावरही अन्याय होऊ नये, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.