अंतराळातूनही दिसतोय प्रदूषणाचा विळखा

NASA चे फोटो व्हायरल

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
Post Diwali Smog in Indiaदिवाळीचा सण संपल्यानंतर उत्तर भारतातील हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली असून वायू प्रदूषणाने गंभीर रूप धारण केले आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि शेजारील राज्यांवर प्रदूषणाची एक दाट राखाडी चादर पसरली असून, हा धुरकट थर थेट अवकाशातूनही स्पष्टपणे दिसून येत आहे. नासाच्या वर्ल्डव्ह्यूने 10 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या लेटेस्ट उपग्रह छायाचित्रांमध्ये उत्तर भारताचा मोठा भूभाग राखाडी धुराने व्यापला असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.
 
 
pollution
हिमालयीन पर्वतरांगांपर्यंत पोहोचला धुरक्याचा थर
नासाने जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांनुसार देशाच्या विविध भागांतील हवेची स्थिती गंभीर दिसून येत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आसपासच्या मैदानी राज्यांमध्ये धुरक्याची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळत आहे. हा प्रदूषित धुरकट थर केवळ मैदानी भागापुरता मर्यादित न राहता उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील हिमालयीन भागांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मध्य आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्येही धुक्याची चादर दिसत असली, तरी उत्तर भारताच्या तुलनेत तिची तीव्रता बरीच कमी आहे. राजस्थान, गुजरात तसेच ईशान्य भारतातील काही भागांमध्ये उत्तर भारताप्रमाणे दाट राखाडी थर दिसून आलेला नाही.
दिवाळीतील फटाके आणि घसरत्या तापमानाचा परिणाम
दिवाळीच्या उत्सवानंतर अवघ्या 2 दिवसांत ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण झपाट्याने वाढते. यापूर्वी नासाने 8 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्येही दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि लगतच्या परिसरावर प्रदूषणाचा दाट थर जमा झाल्याचे स्पष्ट दिसले होते. त्यातच आता उत्तर भारतात तापमानात घट होत असल्याने थंडीमुळे धूर आणि धूलिकण जमिनीलगत अडकून राहतात, ज्यामुळे प्रदूषणाची समस्या अधिकच तीव्र होत चालली आहे.