लोखंडी कठडा कार फाडून आत घुसला, दोन चिमुकल्यांचा मृत्यू

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
रतलाम
ratlam accident
दिल्ली-मुंबई आठपदरी द्रुतगती मार्गावर मध्य प्रदेशातील जावरा परिसरात बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. ताशी सुमारे १०० किलोमीटर वेगाने धावणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कठड्याचा लोखंडी भाग कार फाडून थेट आत घुसला. या दुर्घटनेत १३ वर्षीय सागर व सहा वर्षीय विधी या दोन भावंडांचा मृत्यू झाला, तर त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





जावरा येथील बडावदा चौकाजवळ हा अपघात घडला. कारमध्ये गुजरातमधील हारोल येथे वास्तव्यास असलेले वर्मा कुटुंब प्रवास करत होते. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील आहे. राजाबाबू वर्मा हे स्वतः कार चालवत होते. त्यांच्यासोबत पत्नी रिषू वर्मा (४२), मुलगा सागर आणि मुलगी विधी प्रवास करत होते. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हे कुटुंब आपल्या मूळ गावी जाण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान जावरा परिसरात त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जावरा येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर राजाबाबू आणि रिषू यांना पुढील उपचारांसाठी रतलाम वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. रिषू यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने वर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, अपघातानंतर राजाबाबू वर्मा यांनी द्रुतगती मार्गावरील वैद्यकीय सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. आठपदरी मार्गावर जवळपास रुग्णालय किंवा पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती, तर कदाचित मुलीचा जीव वाचू शकला असता, असेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे वेगवान वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या द्रुतगती मार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्याची व्यवस्था किती सक्षम आहे, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातही यापूर्वी भीषण रस्ते अपघात झाला होता. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते. बैतूलचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (सीएमएचओ) मनोज हुरमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजता हा अपघात झाला होता. नऊ प्रवाशांना घेऊन जाणारी कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. धडक इतकी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सहा जण जखमी झाले. वाढत्या रस्ते अपघातांच्या घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि अपघातानंतर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.