रशिया,
russia-novaya-gazeta-shuts-downस्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करणाऱ्या माध्यमांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना आता रशियातून आणखी एक वाईट बातमी आली आहे. रशियात सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारितेला मोठा धक्का बसला आहे. भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि सरकारी गैरव्यवहार उघड करणारे ‘नोवाया गॅझेटा’ हे वृत्तपत्र अखेर बंद झाले आहे.
तब्बल ३३ वर्षे पत्रकारिता केल्यानंतर ९ नोव्हेंबरला या वृत्तपत्राने मॉस्कोमधील कार्यालय बंद करत असल्याची घोषणा केली. या काळात वृत्तपत्राच्या सहा पत्रकारांची हत्या झाली. पुतीन सरकारकडून येत असलेला दबाव आणि वाढत्या निर्बंधांमुळे काम करणे अशक्य झाल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे.
‘नोवाया गॅझेटा’ची स्थापना १९९३ मध्ये झाली होती. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियात स्वतंत्र पत्रकारितेला नवी संधी मिळत असताना या वृत्तपत्राची सुरुवात झाली. सरकारी भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि चेचन्या युद्धातील अत्याचार यावर अनेक महत्त्वाचे वृत्तांत या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले.
या वृत्तपत्राचे माजी संपादक दिमित्री मुरातोव यांना २०२१ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी हा पुरस्कार वृत्तांकन करताना हत्या झालेल्या सहा पत्रकारांना समर्पित केला होता. त्यामध्ये प्रसिद्ध पत्रकार अॅना पोलितकोव्हस्काया यांचाही समावेश होता. २००६ मध्ये मॉस्कोत अॅना यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
‘नोवाया गॅझेटा’ बंद झाल्याने रशियातील स्वतंत्र पत्रकारितेसमोरील अडचणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या वृत्तपत्रातील काही पत्रकारांनी २०२२ मध्येच रशिया सोडून परदेशात ‘नोवाया गॅझेटा युरोप’ हे स्वतंत्र माध्यम सुरू केले होते. तेथून रशियातील घडामोडींवर वृत्तांकन केले जात आहे.