विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
सोलापूर
Solapur Airport Plane Accident
देशात गेल्या काही वर्षांत विमान अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. बारामती विमानतळावर गेल्या काही दिवसांत दोन विमान अपघातांच्या घटना घडल्या असतानाच आता सोलापूरमधून विमान अपघाताची बातमी समोर आली आहे. सोलापूर विमानतळावर उड्डाणाच्या तयारीत असलेले एक शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरल्याने अपघात झाला. सुदैवाने या घटनेत विमानातील महिला शिकाऊ वैमानिकाला कोणतीही दुखापत झाली नसून ती सुरक्षित असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर विमानतळावर शिकाऊ वैमानिकाला प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येणारे विमान उड्डाणासाठी सज्ज होते. महिला शिकाऊ वैमानिक विमानाचे टेक ऑफ करण्याची प्रक्रिया करत असताना अचानक विमान धावपट्टीवरून घसरले. उड्डाण घेण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान धावपट्टीच्या खाली गेल्याने ही दुर्घटना घडली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील महिला वैमानिक सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला.


दरम्यान, या घटनेनंतर विमानतळावरील परिस्थितीबाबत चर्चा सुरू झाली आहे. विमान नेमके कोणत्या कारणामुळे धावपट्टीवरून घसरले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडूनही या अपघातासंदर्भात सविस्तर अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण समोर येण्यासाठी पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

यापूर्वी बारामती विमानतळावर अल्पावधीत दोन विमान अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर २०२५ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. अहमदाबादहून लंडनकडे प्रवाशांना घेऊन निघालेले विमान उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील २६० जणांचा मृत्यू झाला होता. विमानातील केवळ एकच व्यक्ती या अपघातातून बचावली होती. विमान कोसळलेल्या वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनाही या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले होते.

अहमदाबादच्या भीषण दुर्घटनेनंतर पुन्हा सोलापूरमध्ये विमान अपघाताची घटना घडल्याने विमान सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, सोलापूरमधील घटना शिकाऊ विमानाशी संबंधित असून, विमान टेक ऑफ घेण्यापूर्वीच धावपट्टीवरून घसरल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. विमान धावपट्टीवरून नेमके कशामुळे घसरले, याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही.