स्पाइसजेटच्या अडचणी वाढल्या; दररोज १५ ते २० उड्डाणे रद्द

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
मुंबई
spicejet crisis deepens
स्पाइसजेटच्या कामकाजातील अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देशांतर्गत पर्यटनासोबतच परदेशी पर्यटकांचीही भारतात ये-जा वाढते. अशा काळात स्पाइसजेटकडून अनेक विमानांची उड्डाणे ऐनवेळी पुनर्नियोजित किंवा रद्द केली जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, पर्यायी विमानसेवेचे तिकीट काढण्यासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.



दररोज सुमारे ६५ नियोजित उड्डाणे करणाऱ्या स्पाइसजेटची १५ ते २० उड्डाणे रद्द होत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, अनेक विमानांना तासन्‌तास विलंब झाल्यानंतर त्यांची उड्डाणे रद्द केली जात आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली असून, कंपनीच्या आर्थिक स्थितीबरोबरच तिचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याच्या क्षमतेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

इंधनाच्या देयकांशी संबंधित संभाव्य अडचणींमुळे नुकत्याच अहमदाबाद-श्रीनगर विमानसेवेला विलंब झाला होता. या प्रकारामुळे १८९ प्रवासी अडकून पडले होते. या घटनेनंतर स्पाइसजेटच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या ताफ्यात सध्या केवळ १२ विमाने असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी तीन विमाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपन्यांची देयके थकल्यामुळे उड्डाणांसाठी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. याशिवाय, जून २०२६ पासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याचाही दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, स्पाइसजेट आणि तेल कंपनी यांच्यातील थकीत देयकांवरून इंधन पुरवठ्याबाबत अडचण निर्माण झाल्याची शक्यता प्राथमिक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. देयके थकल्यामुळे इंधन पुरवठादाराने विमानांसाठीचा पुरवठा रोखून धरला असावा, असा अंदाजही व्यक्त होत आहे. मात्र, या व्यत्ययामागे तांत्रिक कारण असल्याचे स्पाइसजेटने स्पष्ट केले आहे.