नवी दिल्ली
swachh survekshan देशातील स्वच्छ शहरांच्या राष्ट्रीय क्रमवारीत विविध श्रेणींमध्ये अनेक शहरांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वच्छ किनारपट्टी शहरांच्या श्रेणीत ओडिशातील पुरीने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, केरळमधील अलप्पुझा दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीने तिसरे स्थान मिळवत राज्याचा मान उंचावला आहे. नदीकिनारी वसलेल्या स्वच्छ शहरांच्या श्रेणीत मध्य प्रदेशातील रीवा अव्वल ठरले असून, छत्तीसगडमधील बिलासपूर आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे.

दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत आंध्र प्रदेशातील ग्रेटर विशाखापट्टणमने पहिला क्रमांक मिळविला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर दुसऱ्या, तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिमालयीन शहरांच्या श्रेणीत उत्तराखंडमधील रुद्रपूर सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले असून, जम्मूने दुसरे स्थान मिळविले आहे. या क्रमवारीत किनारपट्टीवरील शहरे, नदीकाठची शहरे आणि मोठ्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छता कामगिरीचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६' प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान-शहरी' अंतर्गत देशभरातील शहरांनी स्वच्छता आणि नागरी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी केलेल्या कामगिरीचा गौरव या पुरस्कारांद्वारे करण्यात आला. या वर्षीच्या 'स्वच्छ शहर लीग' श्रेणीत नवी मुंबईने देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा मान मिळविला. गुजरातमधील सुरत दुसऱ्या, तर आंध्र प्रदेशातील विजयवाडा तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या दहाव्या आवृत्तीच्या पूर्ततेनिमित्त हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील शहरांच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी हे सर्वेक्षण राबविले जाते. यंदाच्या सर्वेक्षणासाठी 'स्वच्छतेची नवी पहल – वाढवू हात, करू स्वच्छता साथ' ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती.
'स्वच्छ शहर लीग' श्रेणीत शहरांचे मूल्यमापन स्वच्छता, परिसराची निगा आणि कचरा व्यवस्थापनाच्या निकषांवर केले जाते. शहरांमधील स्वच्छतेचा दर्जा उंचावणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि एकूण नागरी स्वच्छतेत सुधारणा घडवून आणणे, हा या क्रमवारीमागील मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात २०१६ मध्ये झाली होती. पहिल्या वर्षी देशातील केवळ ७३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा यात समावेश होता. त्यानंतर या उपक्रमाचा विस्तार होत गेला. यंदाच्या दहाव्या आवृत्तीत देशभरातील ४ हजार ७५१ हून अधिक शहरांचे मूल्यांकन करण्यात आले.
यंदाच्या सर्वेक्षणात मूल्यमापनाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, नागरिकांच्या अभिप्रायाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. शहरी नदीकिनारे, किनारपट्टीचे भाग आणि विविध जलस्रोतांचाही सर्वेक्षणात व्यापक समावेश करण्यात आला. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौच आणि लघुशंका करण्याच्या समस्येला आळा घालणे, पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक वारसास्थळांवरील स्वच्छता राखणे, तसेच शाळांमध्ये स्वच्छतेविषयी वर्तनात्मक बदल घडविणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे, अशा नव्या निकषांचाही समावेश करण्यात आला.
दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण-२०२६ मध्येही उत्तर प्रदेशच्या लखनौने देशात प्रथम क्रमांक मिळविला होता. लखनौने १९८ गुण मिळविले होते. मध्य प्रदेशातील इंदूर १९७ गुणांसह दुसऱ्या, तर जबलपूर तिसऱ्या क्रमांकावर होते. या क्रमवारीत महाराष्ट्रातील नागपूरचाही समावेश झाला होता. त्यामुळे स्वच्छता आणि हवेच्या गुणवत्तेच्या निकषांवर देशातील शहरांच्या कामगिरीकडे लक्ष वेधले जात आहे.