रोहित-विराटसह भारताची लाजिरवाणी सुरुवात!

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
rohit-and-virat भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाची अत्यंत खराब सुरुवात झाली. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही खाते उघडता आले नाही. विशेष म्हणजे, पहिल्याच षटकात भारताने एकही धाव न करता तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाची अशी सुरुवात होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
 
rohit-and-virat
 
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने विल यंगच्या शतकी खेळीच्या जोरावर ३३३ धावांची मोठी मजल मारली. त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी ३३४ धावांचे आव्हान होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात भारतीय डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली.
 
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने गोलंदाजीची सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजीचा डोलारा कोसळला. षटकातील पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीलाही मोठी खेळी करता आली नाही. अवघे चार चेंडू खेळल्यानंतर तो शून्यावर माघारी परतला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला, मात्र त्यालाही पहिल्याच चेंडूवर बाद व्हावे लागले. अशाप्रकारे मॅट हेन्रीने एकाच षटकात एकही धाव न देता तीन बळी मिळवले.
 
रोहित शर्मा आणि विराट कोहली एकाच एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी २०१० मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात दोघांनाही खाते उघडता आले नव्हते. त्या सामन्यात विराट कोहली तीन चेंडू खेळून, तर रोहित शर्मा दोन चेंडू खेळून बाद झाला होता. विशेष म्हणजे, त्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि दिनेश कार्तिक यांनी भारतीय डावाची सुरुवात केली होती. रोहित चौथ्या, तर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्या लढतीत सेहवागने १०० चेंडूंमध्ये नाबाद ९९ धावा केल्या होत्या आणि भारताने सामना जिंकला होता.
 
एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात तीन फलंदाज शून्यावर बाद होण्याची घटना यापूर्वीही घडली आहे. १९८३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड, १९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि २००३ मध्ये बांगलादेशविरुद्ध श्रीलंका यांच्या सामन्यांत अशा प्रकारची नामुष्की पाहायला मिळाली होती. २०२६ मध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धही अशीच कामगिरी नोंदवली होती. आता या यादीत भारतीय संघाचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे खाते उघडण्यापूर्वीच तीन फलंदाज बाद होण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.