जिल्हा बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती

दिवाळीला पालकमंत्री डॉ. भोयर यांची भेट

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
वर्धा,
dr-bhoyar वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमतेसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून दिवाळीच्या मुहूर्तावर सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने शासन आदेश निर्गमित केला.
 
 
 
यासंदर्भात २१ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी निवेदन देऊन वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वर्तमान सद्यस्थितीकडे लक्ष वेधले होते. सन २००२ पासून बँक आर्थिक अडचणीत आली होती. सन २०१४ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून तेव्हापासून प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. जिल्हा सहकारी बँक आर्थिक संकटात सापडल्याने जिल्ह्यातील हजारों शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी व कष्टकर्यांची रक्कम बँकेत अडकली. बँकेला आर्थिक बळ देऊन तिचा बँकींग परवाना पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत बँकेला केंद्र व राज्य शासनाकडून अनुक्रमे २२.१७ कोटी रुपये व १३९ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले होते. त्यामुळे बँकेचा परवाना पुनर्जीवित करण्यात आला.
 
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती. ही नियुक्ती झाल्यास बँकेच्या प्रशासकीय व आर्थिक कारभाराला अधिक सक्षम दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत सहकार विभागाचे प्रधान सचिव यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने शासन आदेश निर्गमित करीत वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे. सदर नियुक्तीमुळे सहकारी बॅक सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.