नवी दिल्ली,
chhath-festival-begins-today सूर्योपासना आणि लोकश्रद्धेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या चार दिवसीय छठ महोत्सवाला आज, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. देशभरात या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून घाट, नदीकिनारे आणि बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ उत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियावरील एक्स या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. चार दिवसांच्या या पवित्र उत्सवाच्या प्रारंभानिमित्त सर्व देशवासीयांना शुभेच्छा देताना त्यांनी छठी मातेचा आशीर्वाद सर्वांना लाभावा, अशी प्रार्थना केली. आज नहाई-खाईच्या विधीने उत्सवाला सुरुवात होत असून, सर्व भाविकांना त्यांनी अभिवादनही केले. छठ महोत्सवातील पहिल्या दिवशी भाविक नहाई-खाईचा विधी करतात. त्यानंतर शनिवारी उपवास करून खरना प्रसाद ग्रहण केला जाईल. रविवारी सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यात येईल. तर सोमवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन या चार दिवसीय उत्सवाची सांगता होणार आहे.
बिहारसह दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही छठ पूजेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नदीकिनारे आणि घाटांची स्वच्छता करून त्यांची सजावट करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रात छठ उत्सवाच्या आयोजनावरून राजकीय वादही निर्माण झाला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठीची गाणी वाजवण्यास तसेच जुहू समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजा करण्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह मनसेने विरोध दर्शवला असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
दुसरीकडे, रेल्वे प्रशासनाने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार उत्तर भारतीय प्रवाशांच्या सोयीसाठी लाऊडस्पीकरवर आवश्यक घोषणा केल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांना माहिती देण्यासाठी अधूनमधून छठ उत्सवाची गाणीही वाजवली जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
छठ उत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने देशभरातील रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. घाटांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि पूजेच्या साहित्याची बाजारपेठांमध्ये लगबग सुरू आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.