अनिल कांबळे
नागपूर,
crime news भाऊबीजेच्या दिवशी मित्राच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीची भेट घेतल्याचा राग मनात धरून चौघांनी एका २१ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करीत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली. सातेंद्र शैलेंद्र राय असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विकास कुशवाह याच्यासह चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३५ च्या सुमारास राजीवनगर येथील शिवदुर्गा मंदिरामागे घडली. सातेंद्र आणि विकास हे एकाच परिसरात राहतात. विकासच्या पत्नीची लग्नापूर्वी सातेंद्रशी मैत्री होती. लग्नानंतरही ती त्याला भावाप्रमाणे मानत असल्याने दोघांमध्ये सलोख्याचे संबंध होते. मात्र, पत्नीचे सातेंद्रशी असलेले संबंध विकासला मान्य नव्हते. याच कारणावरून त्याने सातेंद्रशी बोलणेही बंद केले होते. ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या निमित्ताने विकास घरी नसताना सातेंद्र त्याच्या घरी गेला होता. पत्नीला भेटण्यासाठी सातेंद्र घरी आल्याची माहिती विकासला मिळताच त्याने सातेंद्रला फोन करून शिवदुर्गा मंदिराजवळ बोलावले. सातेंद्र तेथे पोहोचताच विकास, जॅकी सिंग, इंद्रजित यादव आणि सनी पासवान हे दोन वाहनांमधून घटनास्थळी आले. विकासच्या अनुपस्थितीत पत्नीला भेटण्यासाठी घरी का गेला, असा जाब विचारत त्यांनी सातेंद्रशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी चाकूने सातेंद्रच्या छातीच्या उजव्या बाजूला, पाठीवर आणि कमरेखाली अनेक वार केल्याचा आरोप आहे. याशिवाय दारूच्या बाटलीने त्याच्या डोक्यावर प्रहार करीत लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले.crime news गंभीर जखमी सातेंद्रला तातडीने शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न), ३(५) (सामूहिक हेतू) यांसह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.