सायबर चोरट्यांनी तिघांना २८.४३ लाखांचा गंडा घातला

व्यापारी, आयटी अभियंता आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या बँक खात्यांवर डल्ला;

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
cybercriminals मोबाइल हॅक करून बँक खात्यांमधून परस्पर पैसे वळविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच नागपुरातील तीन जणांना सायबर चोरट्यांनी एकूण २८ लाख ४३ हजार १४५ रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. फसवणुकीच्या या स्वतंत्र घटनांमध्ये गांधीबाग येथील कापड व्यापारी, इंदोरा चौकातील आयटी अभियंता आणि बुटीबोरी येथील सरकारी कर्मचाऱ्याला आर्थिक फटका बसला. त्यांच्या बँक खात्यांतून कोणतीही परवानगी न घेता ऑनलाइन व्यवहार केल्याचा आरोप आहे.
 
cybercriminals
 
 
व्यापाऱ्याच्या खात्यातून १८.८२ लाख लंपास
गांधीबाग येथील ३८ वर्षीय कापड व्यापारी हरिकवल श्रीराम पोपटी यांच्या ६२ वर्षीय आईच्या इतवारी येथील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून १८ लाख ८२ हजार ४६८ रुपये परस्पर वळविण्यात आले. पोपटी यांचे श्री रुक्मिणी साडी नावाचे दुकान असून, ते स्वतःच्या मोबाइल क्रमांकाद्वारे आईचे बँक खाते हाताळतात. ८ ऑक्टोबर रोजी मोबाइलवर स्वयंचलित अपडेट सुरू असताना त्यांना वाणी साबीर नावाच्या व्यक्तीच्या नावे ९९ हजार ६ रुपयांचा गुगल पे व्यवहार झाल्याचे दिसले. त्यांनी खात्याची तपासणी केली असता एकूण २२ अनधिकृत व्यवहारांतून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे वळविल्याचे उघड झाले. या व्यवहारांबाबत कोणताही ओटीपी, एसएमएस किंवा अलर्ट मिळाला नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मोबाइल हॅक करून ही फसवणूक करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
आयटी अभियंत्याला ५.९१ लाखांचा फटका
इंदोरा चौकातील ३३ वर्षीय आयटी अभियंता भारतेश विनायक वाळदे यांचाही मोबाइल हॅक करून ५ लाख ९१ हजार ९०० रुपये लंपास करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या शाओमी एमआय ११एक्स मोबाइलद्वारे अ‍ॅक्सिस बँक आणि सारस्वत बँकेच्या खात्यांसह त्यांची बहीण हर्षा यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातूनही पैसे काढण्यात आले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सरकारी कर्मचाऱ्याच्या खात्यातून सहा व्यवहार
तिसऱ्या घटनेत ५७ वर्षीय सरकारी कर्मचारी अरविंद गोविंदराव गौतमारे यांच्या बुटीबोरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून सहा अनधिकृत यूपीआय व्यवहारांद्वारे ३ लाख ६८ हजार ७७७ रुपये वळविण्यात आले. १५ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे व्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.cybercriminals गौतमारे हे डिजिटल व्यवहारांसाठी फोनपेचा वापर करतात. मात्र, संबंधित व्यवहारांना आपण परवानगी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बीएनएस आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे.
तीनही घटनांमध्ये मोबाइल आणि डिजिटल बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनधिकृत व्यवहार आढळताच बँकेला आणि सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तातडीने कळविण्याचे आवाहन करण्यात येते.