खोट्या गोष्टी रचू नका’; समरीनचा इशारा

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
मुंबई,
samreens-warning भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंगसोबत साखरपुडा झाल्यानंतर अभिनेत्री आणि मॉडेल समरीन कौर सध्या चर्चेत आहे. मात्र, सोशल मीडियावर तिचे नाव यूट्यूबर आशिष चंचलानीसोबत जोडले जात असल्याने तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या चार वर्षांपासून आशिषशी आपला कोणताही संपर्क नसल्याचे स्पष्ट करत तिने खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांना सुनावले आहे.
 
samreens-warning
 
समरीनने १३ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. आशिष चंचलानीसोबतचे जुने फोटो आणि यूट्यूब व्हिडिओ वापरून सोशल मीडियावर अनेक रील्स तयार केल्या जात असल्याचे तिच्या निदर्शनास आले. सुमारे चार वर्षांपूर्वी तिने आशिषसोबत काम केले होते. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये कोणतेही संभाषण झालेले नाही किंवा त्यांनी एकत्र नवीन कंटेंटही तयार केलेला नाही, असे तिने स्पष्ट केले. जुन्या छायाचित्रांचा आणि व्हिडिओंचा आधार घेऊन सध्याच्या घडामोडींशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे समरीनने म्हटले आहे. केवळ व्ह्यूज आणि प्रसिद्धीसाठी अशा प्रकारच्या पोस्ट तयार केल्या जात असल्याचा आरोपही तिने केला.
 
याशिवाय, काही पॉडकास्टमध्ये ज्या मुलीचा उल्लेख करण्यात आला आहे, ती आपण नसल्याचेही समरीनने स्पष्ट केले. यापूर्वीही याबाबत स्पष्टीकरण देऊनही आपले नाव वारंवार अशा चर्चांमध्ये ओढले जात असल्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली. दिशाभूल करणारा मजकूर किंवा क्लिकबेटसाठी आपले नाव आणि फोटो वापरणाऱ्यांविरोधात तिची टीम कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराही तिने दिला आहे.
 
सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासण्याचे आवाहन समरीनने केले आहे. व्हायरल होणाऱ्या प्रत्येक पोस्टमागे खऱ्या व्यक्तींची प्रतिष्ठा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी जुन्या गोष्टींना नव्या घटनांशी जोडणे योग्य नाही. इंटरनेटवरील प्रत्येक गोष्टीचे कंटेंटमध्ये रूपांतर करण्याची गरज नाही, असेही तिने ठणकावून सांगितले.
 
दरम्यान, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी समरीन कौर आणि अर्शदीप सिंग यांनी आपल्या साखरपुड्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत एकत्र आयुष्य घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या घोषणेनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र, त्याचवेळी जुन्या फोटोंवरून सुरू झालेल्या चर्चांना समरीनने आता स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.