समृद्धी महामार्गावर भीषण अपघात!

भरधाव कंटेनरच्या धडकेत २५ ते ३० वाहनांचा चक्काचूर; सुमारे ३० प्रवासी जखमी

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
सिंदखेड राजा,
samruddhi-expressway बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातून जाणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आज एक अत्यंत भीषण साखळी अपघाताची घटना घडली. तढेगाव गावाजवळील खडकपूर्णा नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने नियंत्रण सुटल्याने समोरील तब्बल २२ ते ३० वाहनांना जोरदार धडक देत फरफटत नेले. या भीषण अपघातात सुमारे ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली आहे.
 
 
samruddhi-expressway
 
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव शिवारातील खडकपूर्णा नदीवरील पुलावरून वाहनांची नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती. याच दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अवजड कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरने समोर असलेल्या एका वाहनाला जोरदार धडक दिली आणि वेग प्रचंड असल्याने या धडकेत पुढे असलेल्या एकापाठोपाठ एक अशा सुमारे २५ ते ३० वाहनांचा भीषण साखळी अपघात झाला. या अपघातात अनेक चारचाकी वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, प्रवाशांमध्ये भीतीचे आणि आरडाओरड्याचे वातावरण निर्माण झाले होते.
 
 
बचावकार्य आणि वाहतूक कोंडी
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी युद्धपातळीवर मदतकार्य राबवत वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि तातडीने नजीकच्या शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी हलवले. या साखळी अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
 
 
अधिकृत माहितीची प्रतीक्षा
या अपघातात सुमारे ३० जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला, तरी जखमींची नेमकी आणि अधिकृत आकडेवारी तसेच अपघाताचे नेमके तांत्रिक कारण अद्याप पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.