आसाममध्ये बस-ट्रकची भीषण धडक; १६ जणांचा मृत्यू

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |

गुवाहाटी,
horrific-collision-between-a-bus-and-a-truck आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान परिसरात शुक्रवारी भीषण रस्ते अपघात झाला. प्रवासी मिनीबस आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 
horrific-collision-between-a-bus-and-a-truck
 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७१५ वरील कोहोरा रेंजमधील हाटिकुली टी इस्टेटजवळ रंगजन परिसरात ही दुर्घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनीबसची समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकशी जोरदार टक्कर झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.

 
गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्निल डेका यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात १६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलीस आणि बचाव पथकांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू असून बसमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम करण्यात येत आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

 
अपघाताची माहिती मिळताच आसामचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री तसेच स्थानिक आमदार अतुल बोरा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. जखमींना कोहोरा मॉडेल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मिनीबस चालकाने काझीरंगा राष्ट्रीय उद्यान परिसरातील निर्धारित वेगमर्यादेचे उल्लंघन केले होते. अतिवेगामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
मध्य प्रदेशात एसयूव्ही-ट्रकची धडक; चौघांचा मृत्यू
दरम्यान, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातही भीषण अपघाताची घटना घडली आहे. देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर गोपाळपुरा गावाजवळ भरधाव ट्रक आणि एसयूव्ही यांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत एसयूव्हीमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले.

 
अपघातातील सर्व प्रवासी भैंसा गावातील रहिवासी होते. अमावस्येनिमित्त नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी ते बर्मन येथे जात असताना हा अपघात झाला. धडकेनंतर एसयूव्हीचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला गाडीचा काही भाग कापून बाहेर काढावा लागला.