अश्लील फोटो अन् युद्धयोजनेची गुपिते!

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
iaf-officer-pakistan-spy-caseभारतीय हवाई दलातील एका विंग कमांडरने देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानमधील कथित गुप्तहेराला पुरवल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. सुमारे पाच महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेल्या या अधिकाऱ्याविरोधात अधिकृत गोपनीयता कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याने युद्धयोजनेची कागदपत्रे, ड्रोन यंत्रणेची क्षमता आणि लष्करी तैनातीसंबंधीची माहिती शेअर केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 

pok spy case 
पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, संबंधित अधिकाऱ्याने पाकिस्तानी गुप्तहेराला एका गोपनीय युद्धयोजनेतील कागदपत्रे, गुप्त ड्रोन युनिटची संख्या आणि संघटनात्मक रचना, ड्रोनच्या चाचण्यांची माहिती, शस्त्रप्रणालीची कार्यक्षमता तसेच लक्ष्य निश्चित करण्याच्या यंत्रणेसंबंधी तपशील दिले. तसेच युद्धजन्य परिस्थितीत तैनातीची ठिकाणे, लढाऊ विमानांच्या हालचाली आणि संवेदनशील लष्करी आस्थापनांचे निर्देशांक शेअर केल्याचा आरोप आहे. लेह येथील विमानांची तैनाती आणि सूरतगडमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमधील लष्करी सरावाचा तपशीलही पुरवण्यात आला. या माहितीमुळे देशाच्या लष्करी साधनसामग्रीची सुरक्षितता धोक्यात येऊ शकली असती. तसेच लष्करी कारवायांमधील कमकुवत बाजू उघड होऊन राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
 
या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी गुप्तहेराने संबंधित अधिकाऱ्याला एक अश्लील छायाचित्र पाठवल्यानंतर त्याने गोपनीय युद्धयोजनेतील एका पानाचे छायाचित्र अपलोड केले. इतकेच नव्हे, तर प्रत्येक अश्लील छायाचित्राच्या बदल्यात युद्धयोजनेचे एक नवीन पान देण्याची तयारीही त्याने दर्शवल्याचा आरोप आहे.