नवी दिल्ली,
india-retail-inflation-rbi-rate-hikeखाण्यापिण्याच्या वस्तू महागल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेली सहा टक्क्यांची कमाल मर्यादा पार करून ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ महागाईच्या दराने ६.०९ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. सप्टेंबर महिन्यात देशाचा एकत्रित किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के होता. महागाईच्या दराने दोन वर्षांनंतर प्रथमच सहा टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून पुढील काही महिन्यांमध्ये महागाईचा दर सहा टक्क्यांवरच राहणार असल्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे ‘आरबीआय’कडून डिसेंबर महिन्यात व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता वाढली आहे.
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आज या संदर्भात जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार अन्न महागाईचा दर ८.९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांना महागाईची झळ जास्त बसली आहे. ऑक्टोबरमध्ये ग्रामीण भागातील किरकोळ महागाई दर ६.६३ टक्के, तर शहरी भागात ५.४१ टक्के नोंदविला गेला आहे. अन्नधान्य महागाईचा विचार करता सप्टेंबरमधील ७.७४ टक्क्यांवरून हा दर ऑक्टोबरमध्ये ८.९४ टक्क्यांवर गेला असून, ग्रामीण भागात तो ९.०९ टक्के तर शहरी भागात ८.६८ टक्के आहे.
दूध, साखर, कांद्याचे दर नोव्हेंबर महिन्यातही चढेच राहणार असल्यामुळे अन्नधान्याच्या किमतीचा निर्देशांक आठ टक्क्यांवरच राहणार असल्याचा अंदाज आहे. अपुरा मॉन्सून आणि जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर रब्बीच्या हंगामातील उत्पादनाविषयी निर्माण होणाऱ्या शंकांमुळे अन्नधान्याचे भाव दीर्घकाळासाठी वाढलेले राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी देशभरातील एक हजार ४०७ शहरी बाजारपेठा (ऑनलाइन बाजारपेठांसह) आणि एक हजार ४६५ गावांमधून दर आठवड्याला प्रत्यक्ष किमतींची माहिती गोळा करून हा अहवाल तयार केला आहे. नोव्हेंबर २०२६ महिन्याची महागाईची आकडेवारी आता १४ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.