नवी दिल्ली,
india-visitor-visa-rulesपरदेशी नागरिकांसाठी भारताची व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने व्हिसा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या १३ वरून ९, तर उपश्रेणींची संख्या ४९ वरून २३ करण्यात आली आहे. टूरिस्ट व्हिसाचे नाव बदलून व्हिजिटर व्हिसा करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली.
नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयाकडून माहिती-तंत्रज्ञान प्रणाली अद्ययावत करण्यात येत असून, या सुधारणांनुसार चालू वर्षाच्या अखेरपर्यंत व्हिसा देण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.
पूर्वीच्या टुरिस्ट व्हिसाचे नामकरण आता व्हिजिटर व्हिसा असे करण्यात आले आहे. पर्यटनाबरोबरच व्यावसायिक बैठका, वैद्यकीय सल्लामसलत, आरोग्यविषयक उपचार, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि पर्वतारोहण यांसारख्या बाबींचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
व्हिजिटर व्हिसाचे व्ही-१ आणि व्ही-२ असे दोन प्रकार असतील. व्ही-१ व्हिसा पर्यटन, व्यावसायिक बैठका, वैद्यकीय सल्लामसलत, आरोग्यविषयक उपचार, वेलनेस रिट्रीट तसेच भारतीय भाषा, संगीत, कला आणि हस्तकलेच्या अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी दिला जाईल. हा व्हिसा ३० दिवसांच्या कालावधीसाठी आणि अनेकदा प्रवेश करण्याच्या सुविधेसह असेल. व्ही-२ व्हिसा दीर्घकालीन भारतभेटीसाठी असेल. अर्जदाराच्या पात्रतेनुसार तो एक, पाच किंवा दहा वर्षांच्या मुदतीसाठी दिला जाईल.
नव्या व्यवस्थेमुळे व्हिसा अर्जातील आवश्यक माहिती भरण्याची गरज ६५ ते ७० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. सर्व २३ श्रेणी आणि उपश्रेणींमधील अर्जांचे स्वरूप अधिक सुटसुटीत करण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदारांचा वेळ वाचणार असून, व्हिसा अर्जाची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशी नागरिकांच्या भारतभेटीच्या विविध उद्देशांचा विचार करून व्हिसा व्यवस्था अधिक सुसंगत आणि परिणामकारक करण्यात आली आहे.