मस्कत,
indian-sailors-oil-tanker-attackहोर्मुझची सामुद्रधुनी, पर्शियन आखात आणि यूएईमधील मीना साकरजवळ तीन तेलवाहू जहाजावर हल्ला झाला. या जहांजावर भारतीय खलाशी तैनात होते. हल्ल्यानंतर खलाशांनी समुद्रात उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला. सर्व २८ खलाशांना समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात यश आले. १० आणि ११ नोव्हेंबरदरम्यान ४८ तासांच्या कालावधीत, तीन वेगवेगळ्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.
हल्ल्याच्या घटना पर्शियन आखात, होर्मुझ सामुद्रधुनी आणि यूएईमधील मीना साकरजवळ घडल्या. या जहाजांवर एकूण २८ भारतीय खलाशी होते. त्यापैकी एक खलाशी किरकोळ जखमी झाला असून, इतर सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून दिली. पहिली घटना १० नोव्हेंबर रोजी घडली. लायबेरियन ध्वज असलेला तेल टँकर, एमटी फुजैराह एनर्जी, अल रुवैसहून दुबईला जात असताना पर्शियन आखातात त्यावर एका क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला.
यानंतर ११ नोव्हेंबर रोजी होर्मुझमधून जात असताना सौदी अरबचा ध्वज असलेल्या एनसीसी फजर या टँकरवर हल्ला झाला. लायबेरियन ध्वज असलेल्या कच्च्या तेलाचे टँकर, एमटी डॉमिनिका प्रॉस्पेरिटीला देखील संयुक्त अरब अमिरातीमधील मीना साकरजवळ लक्ष्य करण्यात आले. या तीन घटनांमुळे सागरी मार्गांवरून प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. तिनही हल्ल्यातून २८ भारतीय खलाशी बचावले आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सरकार जहाज व्यवस्थापन कंपनीच्या संपर्कात असून खलाशांच्या सुरक्षिततेवर, वैद्यकीय आणि इतर गरजांवर लक्ष ठेवून आहे.
आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे पालन व्हावे
व्यापारी जहाजे आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताने संयम बाळगण्याचे आणि आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांचा सुरक्षित, मुक्त आणि विनाअडथळा मार्ग असावा, अशी भारताची इच्छा आहे. नागरी जहाजे आणि खलाशांवरील हल्ले रोखण्यासाठी भारत या प्रकरणातील सर्व संबंधित पक्षांच्या संपर्कात आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगासाठी एक महत्त्वाचा ऊर्जा मार्ग आहे. जगातील सुमारे २० टक्के पेट्रोलियम या मार्गातून जाते. कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारत या सागरी मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.