मुंबई,
sharad-kapoor बॉलिवूडमधील ‘जोश’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता शरद कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका भावनिक व्हिडिओमुळे तो चर्चेत आहे. आपल्या चार पाळीव कुत्र्यांपासून काही काळासाठी दूर जाताना शरदला अश्रू अनावर झाले. त्याचा बदललेला चेहरा आणि भावनिक अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
एकेकाळी देखणे व्यक्तिमत्त्व, उंच शरीरयष्टी आणि फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या शरद कपूरने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जोश’ चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्यानंतर मात्र तो हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर गेला. बऱ्याच काळापासून तो मोठ्या पडद्यावर किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसला नव्हता.
अलीकडेच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शरदचा चेहरा पूर्वीपेक्षा बदललेला दिसत आहे. पांढरी दाढी आणि चेहऱ्यावरील वार्धक्याच्या खुणांमुळे त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या व्हिडिओतील सर्वाधिक भावूक करणारा प्रसंग म्हणजे आपल्या पाळीव कुत्र्यांपासून वेगळे होताना त्याला झालेला त्रास.
चार पाळीव कुत्र्यांना काही काळासाठी ठेवणार केंद्रात
मुंबईतील ‘बेजुबान पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट’च्या संस्थापक हेमा चौधरी यांनी शरदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, शरद सध्या काही शारीरिक अडचणींचा सामना करत असून त्याला स्वतःच्या देखभालीसाठीही मदतीची आवश्यकता आहे. त्याच्या घरी पत्नी आणि नवजात बाळ असल्याने चार पाळीव कुत्र्यांची जबाबदारी सांभाळणे कुटुंबासाठी कठीण होत आहे. तसेच कुत्र्यांची नियमित काळजी घेण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती उपलब्ध नाही. या परिस्थितीमुळे शरदच्या चार पाळीव कुत्र्यांना ‘योडा’ या मुंबईतील प्राणी कल्याण केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही व्यवस्था कायमस्वरूपी नसून परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तात्पुरती करण्यात आली आहे.
कुत्र्यांपासून दूर होताना अभिनेत्याला अश्रू अनावर
आपल्या लाडक्या कुत्र्यांपासून काही काळ दूर राहावे लागणार असल्याने शरद कपूर भावूक झाला. व्हिडिओमध्ये तो आपल्या भावना आवरू शकत नसल्याचे दिसते. घराची सध्याची परिस्थिती अनुकूल नसली तरी नवीन बंगला तयार झाल्यानंतर आपले पाळीव प्राणी पुन्हा घरी आणण्याची त्याची इच्छा आहे.
याबाबत बोलताना शरद म्हणाला की, नवीन बंगला तयार झाल्यानंतर तो योडा केंद्राला आपल्या मुलांसारख्या असलेल्या कुत्र्यांना परत देण्याची विनंती करेल. त्यांच्याशिवाय राहणे आपल्याला शक्य नसल्याचेही त्याने सांगितले. आपल्यापासून दूर गेल्यामुळे कुत्रेही दुःखी होतील, अशी भावना त्याने व्यक्त केली. आपण अतिशय भावनिक स्वभावाचे असल्याचे सांगत प्राण्यांशी क्रूरपणे वागण्याचा विचारही करू शकत नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
शरदला ट्रोल न करण्याचे हेमा चौधरी यांचे आवाहन
हा व्हिडिओ शेअर करताना हेमा चौधरी यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना अभिनेत्याला ट्रोल न करण्याची विनंती केली आहे. कुत्र्यांना केंद्रात ठेवण्याचा निर्णय हा प्राण्यांवरील अत्याचाराचा प्रकार नसून शरदच्या सध्याच्या वैयक्तिक परिस्थितीतून घेतलेला कठीण निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेमा या शरदला जवळपास ३० वर्षांपासून ओळखतात. त्याच्या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याची भेट घेतली होती.
व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी शरद कपूरबद्दल काळजी व्यक्त केली आहे. सध्या त्याला टीका करण्याऐवजी सहानुभूती आणि आधार देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. आपल्या पाळीव प्राण्यांवरील शरदचे प्रेम आणि त्यांच्यापासून दूर होताना झालेली त्याची भावनिक अवस्था पाहून चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत.