खरिपाने कंबरडे मोडले; रबीचीही चिंता

पाण्याअभावी शेतकरी हवालदिल

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
वर्धा,
kharif season यंदा पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. पावसाच्या खंडाचा पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्नाऐवजी निराशाच आली. खरीप पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. आधीच कर्ज, बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च डोक्यावर असताना आता रबी हंगामही पाण्याअभावी संकटात सापडण्याची चिन्हे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
 
 

kharif season 
 
खरिपात पाऊस नाही, आता रबीसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरीप हंगामात पिके जगविण्यासाठी केलेला खर्चही अनेकांना वसूल करता आला नाही. रबी हंगामात हरभरा, गहू आणि इतर पिकांच्या माध्यमातून नुकसान भरून काढण्याची आशा होती. मात्र, ऑक्टोबरअखेर विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीपातळी खालावल्याने ही आशाही धूसर झाली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथेची खरी तीव्रता त्यांच्या बोलण्यातून जाणवते. शेतीसाठी वर्षभर राबायचे, कर्ज काढून बियाणे-खते घ्यायची; मात्र निसर्गाने साथ दिली नाही तर सगळे गणितच कोलमडते. खरीप हंगाम हातातून गेला. आता रबीची पेरणी केली तरी पिकांना पाणी कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. पेरणी करून पीक वाळले तर पुन्हा कर्जाचा डोंगर वाढणार, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यातील जलाशयांमध्येही नाममात्र पाणीसाठा शिल्लक असल्याने सिंचनाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन बोअरवेल खोदण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. तसेच जलाशयांतील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहे.kharif season त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळण्याची शक्यता आणखी कमी झाली आहे.
कृषी विभागाने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना यंदा कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शेतातील विहिरींतील पाणी रबी पिकांच्या सिंचनासाठी पुरेल की नाही ही चिंता सतावत आहे.
शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा
शेतीतून उत्पन्न मिळाले तर घर चालते, मुलांचे शिक्षण होते आणि कर्जाचे हप्ते भरता येतात. पण, सलग संकटांनी शेतीच परवडेनाशी झाली आहे. सरकारने आमच्या अडचणी समजून घेऊन भरीव मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.