मुंबई,
maharashtra-cold-weatherनोव्हेंबरमध्ये थंडीची चाहूल जाणवायला सुरू होते. परंतु, यंदा राज्यातील उन्हाचा चटका कमी होण्याची चिन्हे नाहीत. मात्र, पहाटेच्या तापमानात सातत्याने घट होत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचा कडाका, असे दुहेरी हवामान अनुभवायला मिळत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत किमान तापमान १५ अंशांच्या खाली घसरल्याने थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे. निफाडमध्ये राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
गुरुवारी (ता. १२) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ११.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात १२ अंश, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात १२.३ अंश, तर गोंदिया येथे १२.८ अंश तापमानाची नोंद झाली. जळगाव, जेऊर आणि नाशिक येथे किमान तापमान १४ अंशांच्या खाली घसरले. पुणे, सातारा, नागपूर आणि यवतमाळ येथेही पारा १५ अंशांच्या खाली राहिला.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, धुळे आणि जळगाव परिसरात पहाटेच्या तापमानात घट झाल्याने थंडी अधिक जाणवू लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतही किमान तापमान १५ अंशांच्या खाली असल्याने सकाळी गारठा जाणवत आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ येथेही थंडीची चाहूल लागली आहे. परभणीसह मराठवाड्यातील काही भागांतही किमान तापमानात घट झाली आहे.
एकीकडे पहाटे थंडी वाढत असताना दुसरीकडे दुपारचे तापमान मात्र चाळिशीच्या जवळ पोहोचण्याच्या दिशेने आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांत मुंबईतील सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. रत्नागिरी येथे ३६ अंश, तर अकोला, अमरावती, सोलापूर, जळगाव, डहाणू आणि यवतमाळ येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.