पुणे,
mulshi-plus-valley-tourist-deathमुळशी तालुक्यातील प्रसिद्ध प्लस व्हॅली परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा धक्कादायक शेवट झाला. एक शॉर्ट कट या तरुणाला इतका महागात पडला की अवघे काही मिनिट वाचवण्याच्या नादात तो आयुष्य गमावून बसला. हा तरुण पाय घसरून सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पर्यटनासाठी जाताना घेतलेला एक 'शॉर्टकट' या तरुणाच्या जिवावर बेतला आहे. पौड पोलीस आणि विविध रेस्क्यू पथकांनी अथक प्रयत्न करत 'रोप रेस्क्यू ऑपरेशन' राबवून दरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, साहीद अन्सारी (वय २०, सध्या रा. ताथवडे, ता. मुळशी. मूळ रा. बैकटपूर, जि. मुजफ्फरपूर, बिहार) असं मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. साहीद हा आपल्या चार मित्रांसह मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली आणि मिल्कीबार धबधबा परिसर पाहण्यासाठी गेला होता. सर्वजण निसर्गाचा आनंद घेऊन परतत असताना त्यांनी नेहमीच्या सुरक्षित वाटेने जाण्याऐवजी एका 'शॉर्टकट'चा मार्ग धरला. हा शॉर्टकट अत्यंत धोकादायक असून तेथील उतार तब्बल ४५ अंशाचा तीव्र होता. याच तीव्र उतारावरून खाली उतरत असताना अचानक साहीदचा पाय घसरला आणि तो तोल जाऊन थेट अंदाजे २०० फूट खोल दरीत कोसळला.
तरुण दरीत पडल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पौड पोलीस ठाण्याचे पथक, रोहा रेस्क्यू टीम आणि एस.व्ही.आर.एस.एस. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या पथकांनी तातडीने संयुक्त मोहीम राबवत 'रोप रेस्क्यू ऑपरेशन'च्या सहाय्याने दरीत उतरून साहीदचा मृतदेह वर काढला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.