अनिल कांबळे
नागपूर,
tax collector arrested घराच्या जमाबंदी अभिलेखाची माहिती मिळवून देण्यासाठी नागरिकाकडून एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नागपूर महापालिकेच्या कर संग्राहकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. गौरव राजू वानखेडे (२५) असे आरोपी कर संग्राहकाचे नाव आहे. पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.

६२ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या घराचे जमाबंदी अभिलेख आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी कायदेशीर अर्ज करून संबंधित अभिलेखाची मागणी केली होती. मात्र, या अभिलेखाची पूर्तता करून देण्यासाठी महापालिकेतील कर संग्राहक गौरव वानखेडे याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. शासकीय कामासाठी लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने १२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी विभागाने पंच आणि ध्वनिमुद्रण यंत्रासह तक्रारदाराला आरोपीकडे पाठवले. यावेळी वानखेडे याने जमाबंदी अभिलेखाची माहिती देण्यासाठी एक हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतरही त्याने एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने वानखेडेला ताब्यात घेतले.tax collector arrested त्याच्याविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीचे नागपूरचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पीआय मयूर चौरसिया मिलिंद मेश्राम, प्रफुल्ल भातकुलकर,संकेत रामटेके यांनी केली.