नेपाळमध्ये भीषण अपघात! व्हॅन दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू!

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
नेपाळ,
nepal-makwanpur-van-accidentनेपाळच्या मकवानपूर जिल्ह्यात एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारा रस्ते अपघात घडला असून, प्रवाशांना घेऊन जाणारी एक ईव्ही हाय-व्ही व्हॅन थेट 700 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या भयानक दुर्घटनेत चालकासह एकूण 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. गुरुवारी सकाळी भीमफेडी गाव नगरपालिका-6 मधील चिसापानिगढी जवळ भीमफेडी-कुलेखानी-काठमांडू रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्यामुळे ही गाडी खोल दरीत जाऊन आदळली.
 

nepal van accident  
 
मृतांमध्ये महिला आणि चिमुकल्यांचाही समावेश
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, केवळ 10 जणांची आसनक्षमता असलेल्या या ईव्ही व्हॅनमध्ये चालकासह चक्क 15 हून अधिक प्रवाशांना कोंबून भरण्यात आले होते, ज्यामुळे गाडीचा तोल जाऊन हा भीषण अपघात ओढवला. सर्लाही जिल्ह्यातून प्रवाशांना घेऊन निघालेल्या या वाहनातील 10 जणांचा घटनास्थळीच प्राण गेला, तर गंभीर जखमी झालेल्यांपैकी 4 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी मृतांमध्ये 3 महिला, 2 मुली आणि पुरुषांचा समावेश असून सर्व मृत व जखमी हे सर्लाही जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
 
या भीषण अपघातात बचावलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या हेतौंडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये 33 वर्षीय मुकेश यादव, 5 वर्षीय सक्षम कुमार यादव आणि 3 वर्षीय सुदान यादव यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुकेश आणि सक्षम यांची प्रकृती सध्या स्थिर असून चिमुकल्या सुदानच्या प्रकृतीतही हळूहळू सुधारणा होत आहे.
 
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल, नेपाळ सैन्य आणि बागमती प्रदेश आपत्ती व्यवस्थापन गटाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संयुक्तपणे मदत व बचाव कार्य सुरू केले. मकवानपूर जिल्हा पोलीस कार्यालयाचे एसपी श्याम बहादूर खत्री यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकही तातडीने तिथे दाखल झाले असून, दरीतून मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून युद्धपातळीवर राबवली जात आहे.