‘ऑनलाईन’ चेटकिणी

online-witches-magic ऑनलाईन चेटकिणींची सेवा

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
वेध
 
: रेवती जोशी-अंधारे  
९२२३७००२७७
 
online-witches-magic सध्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर तोडगा शोधण्यासाठी एआयचा वापर मुक्तहस्ते केला जातोय. नोकरी कशी मिळवायची? विचारा एआयला (ai)! प्रेम-नात्यातील रेशमी गुंता कसा सोडवायचा? घ्या एआयचा सल्ला! फार कशाला, अमुक ठिकाणी जाण्याचा रस्ता माहिती नाही? करा गूगल (google)! सल्ला देण्यापर्यंतही एक वेळ समजता येईल पण, आपल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वत:च्या प्रयत्नांपेक्षा जेव्हा ऑनलाईन चेटकिणींची सेवा घेतली जाते तेव्हा यामागील भीतीचा वेध घ्यायलाच हवा.
 
 

online-witches-magic 
 
 
online-witches-magic ‘चेटकिणींची सेवा’ म्हणजे जादूटोणा, गंडे-ताबीज, रंगबिरंगी मण्यांच्या माळा अन् लिंबात टोचलेल्या उदबत्त्या (black magic) असे दृश्य डोळ्यांपुढे येते. ‘हॅरी पॉटर’ (harry potter) सिरीज बघून-वाचून झालेल्यांना झाडू, टोकदार टोपी, जादूची कांडी आणि काळे झगे हेदेखील सहज आठवेल. पण, सध्या आपल्या समस्यांखाली पिचलेल्या युवा मंडळींना ऑनलाईन चेटकिणींची भुरळ पडली आहे. त्यांना ‘एट्सी चेटकिणी‘ असे म्हणतात. एट्सी हा एक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म (online shopping platform) असून तिथे हस्तकलेच्या विविध वस्तू, दागिने, सजावटीच्या आणि काही खास प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री करतात. हा प्लॅटफॉर्म जादूटोणा, टोटके आणि चेटूक करण्याविषयीच्या सेवा उपलब्ध करून देतो.
 
 
 
online-witches-magic या ऑनलाईन चेटकिणींचा दावा आहे की, त्या विशिष्ट मंत्रसदृश शब्द उच्चारून, असे खास शब्दोच्चार, कथित पूजा आणि इतर आध्यात्मिक प्रक्रिया करून लोकांच्या जीवनात चांगले दिवस आणतात आणि त्यांच्या समस्या सोडवतात. हे करण्यासाठी त्या चांगली मोठी रक्कम घेतात. लव्ह स्पेल(love spell), गुड लक स्पेल (good luck spell), जॉब स्पेल (job spell), अबेन्डन्स स्पेल अशा प्रकारची सेवा या चेटकिणी ऑफर करतात. लग्नसोहळे किंवा अशाच महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पाऊस पडू नये किंवा खूप ऊन तापू नये म्हणून किंवा एखाद्या खूप मोठ्या कॉन्सर्टची तिकिटे (live concert) मिळविण्यासाठीही असे ‘स्पेल चेटूक’ केले जाते. युरोपियन देशांमध्ये राहणाऱ्या आणि साधारण पंचविशीच्या या चेटकिणी ऑनलाईन रीडींग, क्रिस्टल, ताबीज आणि विशिष्ट प्रकारची पत्रे बनवून विकतात. मृत नातेवाईकांकडून ही पत्रे येत असल्याचा दावा या चेटकिणी करतात. अशा पत्रांना ‘चॅनल्ड् लेटर्स’ म्हणतात.
 
 
online-witches-magic या सगळ्याच चेटकिणी जबरदस्त व्यवसाय करीत आहेत. जीवनात जास्त पैसा, आकर्षक संधी, यश आणि अपेक्षित प्रेम मिळविण्यासाठी युवा पिढी चेटूक करवून घेते. हॉलिवूडचे कलाकारही यात मागे नाहीत. ‘एट्सी’ला भेट देऊन या वस्तू आणि सेवांची चौकशी ग्राहकांची संख्या सतत वाढते आहे. असे चेटूक खरोखर उपयोगी ठरते का? नोकरीत प्रमोशन्स मिळतात का? लग्नाच्या दिवशी पाऊस यायचा थांबतो का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पण, खरा प्रश्न असा की, हा द्राविडी प्राणायाम करण्याची गरज आपल्या मुलामुलींना का पडते? ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ अशा तयारीची, निधडी युवाशक्ती सध्या नेभळट आणि अंधश्रद्धाळू झाली आहे का?
 
 
online-witches-magic हा प्रश्न जास्त महत्त्वाचा यासाठी आहे की, जे युवा तर्क, विज्ञान आणि तंत्रज्ञान या तीन कसोट्यांवर बोलतात, त्यांच्यावर ‘पिक्चर परफेक्ट’ जगण्याचा दबाव आहे, हे यातून दिसतं. तर्कनिष्ठ युवापिढीला मनाच्या कोपऱ्यात या गूढ आणि रहस्यमयी जगाचे आकर्षण आहेच. एकटेपणात गुरफटलेल्या मुलांना भावनिक आधार हवा असतो. त्यांच्या समस्या शांतपणे समजून भक्कम आधार देणारा खांदा हवा असतो. मानवी शक्तीपेक्षा मोठं काहीतरी या जगात आहे, हे त्यांना कळतं पण, ती शक्ती काय आहे? हे वळत नाही. ताण हलका करण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी ते या चेटकिणींची मदत घेतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘ऑनलाईन स्पेल’ खरेदी करणाऱ्या प्रत्येकालाच यश मिळते, असे नाही.
 
 
online-witches-magic धर्माच्या पारंपरिक संकल्पनांपासून दूर जाऊन, अध्यात्म किंवा त्याच्याशी संबंधित उपासना पद्धती म्हणून असे प्रयोग करण्यावर युवावर्गाचा भर दिसतो. विशेषत: कोणतेही बंधन न पाळता, आपली सोय आणि गरजेनुसार सर्वोच्च शक्तीची उपासना करण्याची वृत्ती दिसते. तज्ज्ञांच्या मते, स्पर्धा-ताण यामुळे युवकांच्या झालेल्या मानसिक खच्चीकरणाचे रूपांतर बाजारपेठेत करण्याची असंवेदनशील कृती आहे.
 
 
online-witches-magic ऑनलाईन चेटकिणींची वाढती लोकप्रियता केवळ जादू आणि गूढ जगाचे आकर्षण नाही तर मानवी जीवनातील अनिश्चितता, एकटेपणा आणि हरवलेल्या उमेदीचे मार्ग शोधण्याची धडपड आहे. आम्हा भारतीयांना धर्म-अध्यात्माचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्याचा अभ्यास करून अडचणींना खंबीरपणे तोंड द्यावं. किमान, पाश्चिमात्त्यांचा हा बिनडोकपणा डोळेझाकपणे स्वीकारून युवकांनी ऑनलाईनच काय, पण ‘ऑफलाईन’ चेटकिणींच्याही मागे धावू नयेे. n