रणबीर-आदिनाथची बालमैत्री, आता पडद्यावर भाऊ!

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
मुंबई,
ranbir-adinaths-childhood-friendship अभिनेता रणबीर कपूर सध्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत असून, अभिनेता आदिनाथ कोठारे त्याचा धाकटा भाऊ भरत याच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, पडद्यावर भावांची भूमिका करणाऱ्या या दोघांचे नाते खऱ्या आयुष्यातही अनेक वर्षांपासूनचे आहे. दोघेही एकाच शाळेत शिकले असून, लहानपणी एकाच इमारतीत राहत होते. इतकेच नव्हे, तर शालेय जीवनात त्यांनी एकत्र क्रिकेटचाही आनंद घेतला आहे.
 
ranbir-adinaths-childhood-friendship
 
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिनाथ कोठारे यांनी रणबीरसोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. आयएएनएसशी बोलताना त्यांनी सांगितले की, रणबीर शाळेत त्यांच्यापेक्षा वरिष्ठ होता. दोघांचे घर एकाच इमारतीत असल्याने त्यांची नेहमी भेट व्हायची. शाळेत विनय गांधी यांनी पहिल्यांदा रणबीरशी आपली ओळख करून दिली होती, अशी आठवणही आदिनाथ यांनी सांगितली. लहानपणी एकत्र क्रिकेट खेळणारे हे दोघे आता ‘रामायण’मध्ये राम आणि भरत या भावांच्या भूमिका साकारत आहेत.
 
या दोन्ही कुटुंबांमधील जुने संबंधही आदिनाथ यांनी मुलाखतीत उलगडले. त्यांचे वडील महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत काम केले होते. याच काळात ‘घर घर की कहानी’ या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री नीतू सिंग यांच्या भावाची भूमिका साकारली होती. याबाबत बोलताना आदिनाथ यांनी हा एक विलक्षण योगायोग असल्याचे म्हटले. वडिलांनी कधीकाळी नीतू सिंग यांच्या भावाची भूमिका केली होती आणि आता आपण रणबीर कपूरच्या भावाची भूमिका साकारत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत आहेत. तर आदिनाथ कोठारे भरतची भूमिका साकारत आहेत. नमित मल्होत्रा आणि यश यांच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. याशिवाय रवी दुबे, अनुपम खेर, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय, कुणाल कपूर, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन आणि लारा दत्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात प्रभू रामांच्या बालपणापासून ते १४ वर्षांच्या वनवासापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
 
आदिनाथ कोठारे यांचा अभिनयप्रवासही बालवयातच सुरू झाला. १९९४ मध्ये वडील महेश कोठारे यांच्या ‘माझा चाकुला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘वेड लावी जीवा’ या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आता ‘रामायण’मधील भरतच्या भूमिकेमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीतही विशेष चर्चेत आले आहेत. लहानपणीचे मित्र असलेले रणबीर आणि आदिनाथ मोठ्या पडद्यावर भावांच्या भूमिकेत दिसणार असल्याने या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.