रोहित शर्माचा पहिलाच गोल्डन डक

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
माउंट मौंगानुई,
rohit-sharma भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या निराशेचा सामना करावा लागला. माउंट मौंगानुई येथे सुरू असलेल्या या सामन्यात रोहित पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. मॅट हेन्रीने त्याला बाद करत भारतीय संघाला सुरुवातीलाच धक्का दिला. विशेष म्हणजे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित पहिल्यांदाच गोल्डन डकवर बाद झाला आहे.

rohit-sharma
या विकेटमुळे रोहितच्या नावाची एक नकोशा विक्रमांच्या यादीत नोंद झाली आहे. एकदिवसीय सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याचा समावेश झाला आहे. या यादीत माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांची नावे आघाडीवर आहेत. हे दोघे प्रत्येकी तीन वेळा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत. तर सुनील गावस्कर, रवी शास्त्री, कृष्णमाचारी श्रीकांत, मनोज प्रभाकर आणि आता रोहित शर्मा यांनाही प्रत्येकी एकदा या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.
भारतीय संघाच्या नावावर ४३ वर्षांनंतर नोंदला नकोसा विक्रम
या सामन्यात भारतीय फलंदाजांची अवस्था अत्यंत खराब झाली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत सर्वबाद ३३३ धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी ३३४ धावांचे आव्हान होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच कोलमडली. अवघ्या नऊ धावांमध्ये भारताने चार महत्त्वाचे फलंदाज गमावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या पहिल्या चार विकेट्स दहापेक्षा कमी धावसंख्येवर पडण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरली. यापूर्वी १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत टुनब्रिज वेल्स येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना भारतीय संघाने नऊ धावांत चार विकेट्स गमावल्या होत्या. तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाची अशी अवस्था झाली.
पहिल्याच षटकात तीन दिग्गज फलंदाज बाद
न्यूझीलंडने दिलेल्या ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला पहिल्याच षटकात मोठे धक्के बसले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे तिन्ही फलंदाज खातेही न उघडता माघारी परतले. त्यानंतर ऋतुराज गायकवाडलाही मोठी खेळी करता आली नाही. तो १३ चेंडूंचा सामना करून अवघ्या पाच धावा काढून बाद झाला. अशा प्रकारे सुरुवातीलाच आघाडीचे फलंदाज गमावल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला खिंडार पाडत सामन्यावर पकड मिळवली. चौथ्या एकदिवसीय सामन्यातील ही निराशाजनक सुरुवात भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरली.