मुंबई,
sharad-pawar राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार हे आयुष्याच्या अखेरपर्यंत भाजपमध्ये जाणार नाहीत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कोणत्याही परिस्थितीत एकत्र येणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांच्यासह काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला अधिक जोर मिळाला.
मात्र, या चर्चांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली. शरद पवार यांची राजकीय विचारसरणी भाजपच्या विचारधारेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची राजकीय भूमिका आधारलेली असून धर्मनिरपेक्षता हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शरद पवार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे राऊत म्हणाले.
शरद पवार यांनी संपूर्ण राजकीय कारकीर्द आपल्या विचारधारेशी प्रामाणिक राहून घडवली आहे. अशा परिस्थितीत राजकारणातील शेवटच्या टप्प्यात ते भाजपसोबत जातील, असा विचार करणेही हास्यास्पद आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणल्या जात असून त्यामागे भाजप असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. अजित पवार सत्तेत असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर या विषयावरील चर्चा थांबली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबत आपण कोणाशीही चर्चा केलेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.