वाशीम,
kbc stage छोट्याशा गावातून मोठे स्वप्न पाहत आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर समाजात वेगळी ओळख निर्माण करणारे श्रावण महाराज केळकर (वाशीमकर) यांनी लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये सहभागी होत वाशीम जिल्ह्याचा नावलौकिक देशभर पोहोचविला आहे. या ज्ञानाच्या मंचावर त्यांनी दहा प्रश्नांची अचूक उत्तरे देत पाच लाख रुपयांची रक्कम जिंकली. अकरावा प्रश्न पार केल्यानंतर बाराव्या प्रश्नाचे उत्तर चुकल्याने नियमानुसार त्यांना पाच लाखांच्या स्तरावर परतावे लागले आणि त्यांचा खेळ थांबला. मात्र, या प्रवासातून मिळालेला आनंद आणि वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी हीच आपल्यासाठी मोठी उपलब्धी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
श्रावण महाराज केळकर हे मूळचे वाशीमकर असून, लॉकडाऊनपासून ते अनसिंग येथे वास्तव्यास आहेत. यूट्यूब व्हिडिओ, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ते सातत्याने समाजप्रबोधन व अध्यात्मप्रसाराचे कार्य करतात. वारकरी संप्रदायातील कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख असून, संतविचार आणि अध्यात्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी होण्यामागे श्रावण महाराजांचा एक सुंदर कौटुंबिक हेतू होता. पत्नी आरती नाळे केळकर यांना आनंदी पाहण्यासाठी आणि त्यांच्या चेहर्यावर हसू फुलविण्यासाठी आपण या कार्यक्रमात सहभागी झालो, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमातून मिळणारी संपूर्ण बक्षिसाची रक्कम पत्नीच्या हातात द्यावी, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यानुसार त्यांनी मंचावर अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याकडे ही रक्कम पत्नी आरती यांच्या हातात देण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान राखत माधुरी दीक्षित यांनी जिंकलेली रक्कम आरती यांच्या स्वाधीन केली.
या कार्यक्रमात श्रावण महाराजांनी केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही साधली. कीर्तनकार म्हणून समाजात कोणते कार्य करतो, कीर्तनातून कोणते विचार मांडतो आणि अध्यात्माचा प्रसार कसा करतो, याविषयी त्यांनी मंचावर मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यामुळे मनोरंजन आणि ज्ञानाच्या राष्ट्रीय मंचावर वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याची संधी त्यांना मिळाली.kbc stage ज्ञान, अध्यात्म, कौटुंबिक प्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणारा श्रावण महाराज केळकर यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ मधील प्रवास वाशीम जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे. पाच लाखांचे बक्षीस, पत्नीला माधुरी दीक्षित यांच्या हस्ते मिळालेली रक्कम आणि राष्ट्रीय मंचावर वाशीम व वत्सगुल्मचे नाव पोहोचविण्याचे समाधान, या तिन्ही गोष्टींनी त्यांचा हा प्रवास विशेष संस्मरणीय ठरविला आहे.