मुंबई,
shruti-haasan अभिनेत्री श्रुती हासन आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कॉस्मेटिक सर्जरी केल्याची कबुली देतानाच तिने दारू पिण्याच्या सवयीबाबतही महत्त्वाचा खुलासा केला आहे. आठ वर्षे दारूपासून पूर्णपणे दूर राहिल्यानंतर पुन्हा मद्यपान सुरू केल्याचे तिने सांगितले आहे. नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या 'डबल डेट' या कार्यक्रमात बोलताना तिने हे अनुभव मांडले.
कॉस्मेटिक सर्जरी आणि सौंदर्यप्रक्रियांबाबत बोलताना श्रुतीने कोणतीही गोष्ट लपवून ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद्याने सौंदर्यप्रक्रिया करून घेतली असेल, तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, असे बदल केल्यानंतर त्याबाबत खोटे बोलण्याची गरज काय, असा सवालही तिने उपस्थित केला.
याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना श्रुती म्हणाली की, ती या विषयावर विचारपूर्वक बोलते. मात्र, अशा गोष्टींबाबत खोटे बोलणे मूर्खपणाचे आहे. काही लोकांच्या दिसण्यात स्पष्ट बदल झालेला असतानाही आपण पूर्वीपासून असेच दिसत असल्याचे सांगतात. अशा प्रकारची विधाने तिला विचित्र वाटतात. प्रत्येकाची ही वैयक्तिक निवड असून त्याबाबत कोणताही पूर्वग्रह ठेवण्याची गरज नाही. मात्र, आपण या प्रक्रियांना प्रोत्साहन देत असल्याचा त्याचा अर्थ काढू नये, असेही तिने स्पष्ट केले.
याच मुलाखतीत श्रुतीने मद्यपानाच्या सवयीबद्दलही मनमोकळेपणाने सांगितले. तब्बल आठ वर्षे तिने दारूला हातही लावला नव्हता. मात्र, त्यानंतर पुन्हा मद्यपान करण्यास सुरुवात केली. दारू आपल्यासाठी योग्य नसल्याचे आपण यापूर्वीही उघडपणे सांगितले आहे. सध्या या सवयीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असून त्याबाबत अधिक काळजी घेत असल्याचे तिने सांगितले. याशिवाय मासिक पाळीच्या विषयावरही तिने याच कार्यक्रमात मोकळेपणाने आपले विचार मांडले.
श्रुती हासन ही ज्येष्ठ अभिनेते कमल हासन आणि अभिनेत्री सारिका ठाकूर यांची कन्या आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये तिने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयासोबतच संगीत क्षेत्रातही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैयक्तिक आयुष्यातील विषयांवर बिनधास्तपणे मत मांडण्याच्या तिच्या स्वभावामुळे ती नेहमीच चर्चेत असते.