दुबई,
uae-fujairah-accident-indians-killedसंयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह शहरातून एक अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, फुजैराह येथील शेख खलिफा बिन झायेद रोडवर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला. या अनियंत्रित ट्रचने सुरुवातीला एका वाहनाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे तो उलटला आणि रस्त्यावर ट्रॅफिकमुळे थांबलेल्या इतर अनेक गाड्यांवर आदळला. या धडकेनंतर वाहनांना अचानक भीषण आग लागली आणि ती वेगाने पसरल्यामुळे मोठी जीवितहानी झाली असून या दुर्घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत.
एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश; इतर 4 सदस्य गंभीर जखमी
या दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये भारताच्या केरळ राज्यातील एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा समावेश आहे, ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा येथील रहिवासी असलेले 21 वर्षीय जुळे भाऊ-बहीण मोहम्मद अस्मिल सिद्दीकी आणि मिस्ना जुबिन सिद्दीकी, तसेच त्यांचा अवघ्या 3 वर्षांचा भाचा मोहम्मद फैज अशी मृतांची नावे आहेत. शारजाह येथून आपले कुटुंबीय रात्री सुमारे 11 वाजता फुजैराह येथील घरी परतत असताना फुजैराह कोर्ट हाऊसजवळ त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला. या घटनेत सिद्दीकी यांच्या पत्नीसह इतर 4 जण देखील जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण रस्ते अपघातात युएई, ओमान, भारत, पाकिस्तान, जॉर्डन, ब्राझील आणि इजिप्तसह विविध देशांच्या नागरिकांचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 30 जणांपैकी 15 जणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर उर्वरित 15 जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची तीव्रता इतनी जास्त होती की मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे, त्यामुळे प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्यासाठी ‘डीएनए’ (DNA) चाचण्यांची विशेष मदत घेतली जात आहे.