वाशीम,
Girl Missing शहरातील देवपेठ परिसरातील पौर्णिमा संतोष पेंढारकर (वय १२ ) ही अल्पवयीन मुलगी बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी बेपत्ता होऊन तब्बल १३ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप तिचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. मुलगी सुखरूप परत यावी, या आशेने कुटुंबीय तिची प्रतीक्षा करीत आहेत. दुसरीकडे, एवढा कालावधी उलटूनही मुलीचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिस तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पोलिसांच्या दिरंगाईप्रती नागरीकांमधून रोष व्याप्त होत आहे.

४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास पौर्णिमा शहरातून बेपत्ता झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर तिच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, १३ दिवसांचा कालावधी लोटूनही मुलीचा शोध लागलेला नाही. अल्पवयीन मुलगी बेपत्ता असताना तपासात अधिक तत्परता आणि वेग अपेक्षित असताना अद्याप ठोस माहिती समोर न आल्याने पोलिसांच्या तपासातील दिरंगाईबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संभाव्य मार्गांचा शोध, संबंधित व्यक्तींकडे चौकशी तसेच विविध ठिकाणी शोधमोहीम राबविणे अशा बाबींना अधिक गती देण्याची गरज व्यक्त होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तपासाचा आढावा घ्यावा आणि मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करून तपासाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.