नवी दिल्ली,
bcci-u19-cricketer-nandiniभारतीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या १७ वर्षीय क्रिकेटपटू नंदिनीच्या मृत्यूने क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. बीसीसीआयच्या अंडर-१९ संघात निवड झालेल्या नंदिनीने तेलंगणातील विकाराबाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी ही विकाराबाद जिल्ह्यातील सांगयापल्ली गावची रहिवासी होती. शिक्षण आणि क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती विकाराबादमधील मधू कॉलनी येथे वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वीच तिची बीसीसीआयच्या अंडर-१९ संघात निवड झाली होती. तिच्या या यशामुळे कुटुंबीयांच्या आशा उंचावल्या होत्या. नंदिनी भविष्यात भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करेल, अशी अपेक्षा तिच्या कुटुंबीयांसह परिचितांना होती. मात्र, तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, नंदिनीच्या मृत्यूमागे दोन तरुणांकडून होणारा त्रास कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. अनिल आणि कृष्णा अशी या तरुणांची नावे असल्याचे सांगितले जात आहे. अनिल हा प्रेमाच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून नंदिनीचा वारंवार पाठलाग करत होता, तर कृष्णा त्याला मदत करत असल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासामुळेच नंदिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.या प्रकरणातील दोन्ही तरुणांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नंदिनीच्या कुटुंबीयांनी केली आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.