छत्तीसगड
chhattisgarh दिवाळीचा सण आनंदात साजरा होत असतानाच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेळता खेळता जमिनीवर पडलेला फटका तोंडात घालून चावणे एका दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतले. फटक्याचा तोंडातच स्फोट झाल्याने आदित्य गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असतानाच त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही दुर्दैवी घटना छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्याच्या सितापूर ब्लॉकमधील नवापारा गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ८ आणि ९ नोव्हेंबरदरम्यान आदित्य घराबाहेर आपल्या मित्रांसोबत खेळत होता. याच वेळी त्याला जमिनीवर पडलेला एक छोटासा पॉप-पॉप फटका दिसला. लहानग्या आदित्यला तो नेमका काय आहे, याची कल्पना नव्हती. कुतूहलापोटी त्याने तो फटका उचलला आणि थेट तोंडात घालून चावला.
मात्र, पुढच्याच क्षणी त्या फटाक्याचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आदित्यच्या तोंडाला आणि घशाला गंभीर दुखापत झाली. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. आनंदाने खेळणारा चिमुकला काही क्षणांतच गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे पाहून कुटुंबावर मोठे संकट कोसळले.
उपचार सुरू असतानाच मृत्यूशी झुंज अपयशी
घटनेनंतर जखमी आदित्यला तातडीने सितापूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याचा रक्तस्राव थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा रक्तस्रावाचा त्रास सुरू झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर जखमांवर टाके घातल्यानंतर त्याला अंबिकापूर येथील मिशन रुग्णालयात हलवण्यात आले.आदित्यची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला रक्त देण्याचा सल्ला दिला. मुलाचे प्राण वाचवण्यासाठी वडिलांची धावपळ सुरू झाली. कुटुंबीयांकडून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही नियतीचा घाला चुकवता आला नाही. अखेर ११ नोव्हेंबर रोजी उपचार सुरू असतानाच अवघ्या दोन वर्षांच्या आदित्यने अखेरचा श्वास घेतला.दिवाळीच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने नवापारा गावावर शोककळा पसरली आहे. खेळण्याच्या वयातील चिमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.