मुंबई
Amruta Khanvilkar अभिनेत्री अमृता खानविलकर हिला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मराठी मनोरंजनविश्वासह हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच तिच्या दमदार नृत्याचीही नेहमीच चर्चा होत असते. ‘वाजले की बारा’ आणि ‘चंद्रमुखी’ यांसारख्या गाण्यांमधील तिच्या नृत्याने प्रेक्षकांना अक्षरशः ठेका धरायला लावला. मात्र, प्रसिद्धीच्या झोतात असताना काही अप्रिय अनुभवांचाही सामना करावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रसंग अमृताने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे. एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तिच्याशी अत्यंत अश्लील भाषेत संवाद साधला. या प्रकारानंतर अमृताने संबंधित व्यक्तीविरोधात थेट एफआयआर दाखल केल्याचेही सांगितले.

मुलाखतीत बोलताना अमृताने सांगितले की, एका शूटिंगनंतर ती बाजूला बसली होती. त्यावेळी एका अनोळखी क्रमांकावरून तिला वारंवार फोन येत होते. सामान्यतः अनोळखी नंबरवरून आलेले फोन ती उचलत नाही. मात्र, सतत फोन येत असल्याने कदाचित काही आपत्कालीन कारण असेल, असा विचार करून तिने फोन स्वीकारला. पण पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने अत्यंत घाणेरड्या पद्धतीने संवाद साधण्यास सुरुवात केली. हा अनुभव तिच्यासाठी धक्कादायक आणि संतापजनक होता.
अमृताने पुढे सांगितले की, काही लोकांना एखाद्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मिळाला की ते थेट फोन करतात आणि अनेकदा स्पीकरवर ठेवून बोलतात. फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, तिची ओळख काय आहे, याची कोणतीही माहिती दिली जात नाही. अशा वेळी समोरची व्यक्ती आवाज चढवून जाब विचारू लागली, तर उलट ‘एवढं काय झालं?’ अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते. फोन करायचा असेल तर आधी स्वतःची ओळख सांगावी, संवाद साधण्याची योग्य पद्धत पाळावी किंवा किमान संदेश पाठवावा, अशी अपेक्षा अमृताने व्यक्त केली. अशा मर्यादा ओलांडणाऱ्या काही व्यक्तींविरोधात आपण एफआयआर दाखल केल्याचेही तिने स्पष्ट केले.
या अनुभवातून अमृताने महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर मुद्दाही उपस्थित केला. प्रसिद्ध व्यक्तींना अशा प्रकारच्या फोनचा सामना करावा लागत असेल, तर सर्वसामान्य महिलांची परिस्थिती काय असेल, असा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. अनोळखी व्यक्तींकडून फोनवरून होणारा त्रास, अश्लील संवाद आणि महिलांशी गैरवर्तन याबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.
अमृताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने मराठी चित्रपट आणि मनोरंजनविश्वात अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वाजले की बारा’ आणि ‘चंद्रमुखी’मधील तिच्या नृत्याची लोकप्रियता आजही कायम आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ही गाणी आवर्जून वाजवली जातात. अभिनय आणि नृत्य या दोन्ही क्षेत्रांत स्वतःची वेगळी छाप पाडणारी अमृता सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचा मोठा चाहतावर्ग असून, ती आपल्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, यावेळी तिच्या कामापेक्षा अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या अश्लील फोनच्या अनुभवामुळे आणि तिने घेतलेल्या कायदेशीर भूमिकेमुळे ती चर्चेत आली आहे.