मुंबई,
an-end-to-the-ncps-alliance राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या विषयाला आम्ही पूर्णविराम दिला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. या विषयावर वारंवार बोलूनही चर्चा थांबत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे या मुद्द्यावर आपण कोणतेही भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारण आणि कौटुंबिक संबंध यांची सरमिसळ करू नये, असे आवाहन करताना सत्ता येते आणि जाते; मात्र कुटुंबातील नाती कायम राहतात, असे त्या म्हणाल्या.

सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपले वडील शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी वैयक्तिक टीका करणे आपल्या संस्कारात नसल्याचे सुळे यांनी नमूद केले. २०२३ मध्ये राजकीय घडामोडी घडल्या असल्या, तरी त्याचा कौटुंबिक संबंधांवर परिणाम झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी त्यांचा उल्लेख ज्येष्ठ नेते आणि मोठे बंधू असा केला. त्यांना आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असून, त्यांनी यासंदर्भात लेखन केले तर त्याचे स्वागतच आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, अजित पवार गटाकडून आपल्याला युतीसंदर्भात कोणताही फोन, संदेश, ई-मेल किंवा व्हॉट्सॲप आलेले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबाशी आपले सहा दशकांहून अधिक काळापासून संबंध असल्याचे सुळे यांनी सांगितले. संसदेच्या संयुक्त संसदीय समितीच्या कामकाजातही अनेक जण एकत्र सहभागी होतात. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या आधारे वैयक्तिक संबंधांबाबत निष्कर्ष काढू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या सूत्रांच्या माहितीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, शरद पवार गटाकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सरकारने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला तसेच महिला आरक्षणाला त्यांच्या पक्षाने सकारात्मक पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी या विषयावर पक्षाची जी भूमिका होती, तीच आजही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यावेळी सुळे यांनी, आपला भाऊ गेला आणि दुसरीकडे सत्तेचा उपभोग घेतला जात आहे, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त होते.