नवी दिल्ली
bhagwant mann पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या संभाव्य पाकिस्तान दौऱ्यावरून सुरू झालेल्या चर्चांना आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इतर देशांशी संबंध ठेवताना भारताचे एक निश्चित राष्ट्रीय धोरण असून, प्रत्येकाने त्याचे पालन करणे अपेक्षित आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबत भारताची भूमिका काय आहे, हे सर्वांना स्पष्ट असायला हवे, असा ठाम संदेशही केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे भगवंत मान यांना पाकिस्तान दौऱ्यासाठी केंद्र सरकारकडून राजकीय मंजुरी मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या प्रकरणाची सुरुवात २३ ऑक्टोबर रोजी झाली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना २७ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानमधील लाहोर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 'विश्व पंजाबी संमेलना'साठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण मिळाल्याची माहिती दिली होती. मात्र, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना पाकिस्तानात जाण्याची केंद्र सरकार परवानगी देईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. या निमंत्रणामुळे त्यांच्या संभाव्य पाकिस्तान दौऱ्याची चर्चा सुरू झाली.
याचदरम्यान, करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू झाल्यास पंजाब विधानसभेतील सर्व आमदारांसह पाकिस्तानमधील करतारपूर साहिब गुरुद्वाराला दर्शनासाठी जाण्याची इच्छाही भगवंत मान यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे धार्मिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर या विषयाला महत्त्व प्राप्त झाले.
परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितले?
१३ नोव्हेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत या विषयावर भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, इतर देशांशी संबंधांच्या बाबतीत भारताचे एक राष्ट्रीय धोरण आहे आणि प्रत्येकाने त्याचे पालन करणे अपेक्षित आहे.
परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या मान्यवरांना राजकीय मंजुरी देण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना जयस्वाल यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालय आपल्या व्यापक धोरणाच्या चौकटीत प्रत्येक प्रस्तावाचे मूल्यमापन करते. त्यानंतर संबंधित धोरणानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे अशा दौऱ्यांना मंजुरी देताना केवळ निमंत्रणाचा विचार न करता देशाच्या एकूण परराष्ट्र धोरणाला प्राधान्य दिले जाते.
पाकिस्तानबाबत भारताच्या भूमिकेचा संदर्भ देताना जयस्वाल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबत भारताची भूमिका काय आहे, हे सर्वांना पूर्णपणे स्पष्ट असायला हवे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पाकिस्तानने व्हिसा देण्याबाबत दर्शवली होती तयारी
दरम्यान, भगवंत मान यांच्या पाकिस्तान दौऱ्याच्या चर्चेदरम्यान पाकिस्तानकडूनही महत्त्वाचे विधान करण्यात आले होते. ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते सज्जाद हैदर खान यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना, भगवंत मान पाकिस्तानात येऊ इच्छित असतील तर त्यांना व्हिसा देण्याबाबत पाकिस्तान सरकार विचार करू शकते, असे सांगितले होते. या विधानाची बातमी ७ नोव्हेंबर रोजी समोर आल्यानंतर भारतात या विषयावर राजकीय आणि राजनैतिक चर्चांना वेग आला होता.
खान यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, भगवंत मान पाकिस्तानला भेट देऊ इच्छित असतील तर त्यांना व्हिसा देण्याचा विचार केला जाईल. मात्र, त्यांना पाकिस्तानचा व्हिसा मिळणे आणि भारत सरकारकडून पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी मिळणे या दोन स्वतंत्र बाबी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
पाकिस्तानकडून व्हिसा देण्याबाबत तयारी दर्शविण्यात आली असली, तरी भारत सरकारची मंजुरी हा या दौऱ्यातील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने राष्ट्रीय धोरणाचा संदर्भ देत आपली भूमिका स्पष्ट केल्याने भगवंत मान यांच्या संभाव्य पाकिस्तान दौऱ्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या धोरणात्मक भूमिकेवर अवलंबून राहणार असल्याचे चित्र आहे.